Dasara Melava 2022 : मुंबईत यंदा पहिल्यांदाच दोन मैदानावर दसरा मेळावा पार पडला असून बिकेसी मैदानावर दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाकडून उर्जादायी गाणं रिलीज करण्यात आलं. आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी' हे गाणं वाजायला सुरवात झाली अन एकच जयघोष मैदानावर घुमू लागला. विशेष म्हणजे हे गाणं मंत्री गुलाबराव पाटील यांनी लिहले असून त्यांचीच संकल्पना आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून जोरदार घमासान सुरू होते. आज उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर बिकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळाव्याच्या टिझर पासून अनेक गोष्टींचा उहापोह करण्यात येत होता. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिवसेना स्फुर्तिगीत दसरा मेळाव्याच्या सुरवातीला लॉन्च करण्यात आल. "हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गीता बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 'या गीताच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं. शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास हे या स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल. अन शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल!" या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजाने या गाण्यात अनोखा जोश निर्माण केला आहे. प्रत्येक शिवसैनिकाला आपलंसं वाटणारं, तना-मनात चैतन्य फुलवणारं हे स्फूर्तीगीत आहे. यातील 'शिवसेनेचे मानकरी' ही उपमा प्रत्येक शिवसैनिकाला सुखावणारी आहे. या गीतातून बाळासाहेबांचा अनुकरणीय प्रवास नि कोटी कोटी शिवसैनिकांच्या मनी असलेले त्यांच्या साहेबांबद्दलचे प्रेम, आदर आणि निष्ठा गीतातून अधोरेखित होत असल्याचे दिसते.
शिवसेनेच्या आधी शिंदे गटाचं गाणं...
काल शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन गाणे तयार करण्याची चर्चा सुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर वॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळालं. 'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी' अशा ओळी असलेले हे गाणे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार 'प्रभारंग फिल्म्स् यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे.
महत्वाच्या बातम्या
Dasara Melava 2022 : गुलाबराव पाटलांनी भाषणात 'तो' उल्लेख केला अन् एकनाथ शिंदे भावूक झाले...