Jaidev Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले. 



शिंदे गटाच्या मेळाव्यात काय म्हणाले जयदेव ठाकरे?


आम्ही ठाकरे काही लिखीत घेऊन येत नाही. एकनाथ माझ्या खूप आवडीचा आहे. आता मुख्यमंत्री झालाय, मला एकनाथ राव बोलावं लागेल. पाच सहा दिवस झाले. मला एक एक फोन येत आहेत. आहो, तुम्ही शिंदे गटात गेला आहात का? हा ठाकरे कुणाच्या गोटात बांधला जात नाही. शिंदे यांनी दोन चार भूमिका घेतल्या, त्या मला आवडल्या.  असा धडाडीचा माणून महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे मी म्हणून शिंदेंच्या प्रेमासाठी मी इथं आलो आहे. आपला एक इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ... त्यांना जवळच्यांनीच संपवलं. यांना एकटं पाडू नका.  हा एकटा नाथ होऊ नका... हा एकनाथचं राहू द्या... ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या...  राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. 


बाळासाहेब ठाकरेंचा वंशवृक्ष 


बाळासाहेब ठाकरे-मीनाताई (दिवंगत) यांना तीन अपत्यं आहेत. दिवंगत बिंदुमाधव सर्वात मोठे होते. त्यानंतर जयदेव आणि उद्धव ठाकरे.... बिंदुमाधव यांचा विवाह माधवी यांच्यासोबत झाला होता. त्यांना दोन अपत्य आहेत. मुलाचं नाव निहार तर मुलीचं नाव नेहा असे आहे. निहार ठाकरे सध्या शिंदे गटामध्ये आहेत. 


बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले आहेत. पहिल्या पत्नी जयश्री कलेकर, दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे, तिसऱ्या पत्नी अनुराधा 


जयदेव ठाकरे आणि जयश्री कलेकर यांच्या मुलाचे नाव जयदीप. तर जयदेव आणि स्मिता ठाकरे यांना राहुल आणि एश्वर्य अशी दोन आपत्य आहेत. तर जयदेव ठाकरे आणि अनुराधा यांच्या मुलीचं नाव माधुरी आहे. 


उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना दोन मुलं आहेत. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे... आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत.