Nanded News Update : आजच्या एकविसाव्या शतकात विज्ञानाची एवढी प्रगती होऊनसुद्धा लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहे. त्यामुळे अशा लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांचे दुकान चालत असते. अशाच एका भोंदू बाबाचा नांदेडमध्ये भांडाफोड करण्यात आला आहे. करणी केल्याचे सांगून भावकित भांडण लावणाऱ्या भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तौफिक असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. ईरन्ना बोरोड यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. 


नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामधील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील तौफिक याच्याकडे दैनंदिन समस्या किंवा आजारावरील उपचारासाठी स्थानिक आणि आजूबाजूचे लोक जात असत. आपल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांकडून तो 251, 501 आणि 1001 रुपये घेत होता. समस्या घेऊन गेलेल्या लोकांना तुमची समस्या किंवा आजार करणीमुळे निर्माण झाली आहे असे सांगून त्यासाठी तो काही उपाय सांगत असे. करणीच्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाच-पन्नास लोक गोळा करून अंगात दैवी शक्ती असल्याचा भास हा भोंदूबाबा निर्माण करत होता. 


कासराळी येथील ईरन्ना बोरोड यांचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी ते तौफिकबाबाकडे गेले. यावेळी तौफिक याने अंगात आल्याचे भासवून "तुमचा त्रास रूग्णालयातील नसून रूक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर मंत्राने करणी आणि जादूटोणा केला आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगितले. 


तौफिक याने नाव सांगितल्यामुळे रूक्‍मीनबाईकडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत त्यांनी नांदेडमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली स्टिंग ऑपरेशनची योजना बनवली. त्या योजनेनुसार  सापळा रचून तौफिक याला भोंदूगिरी करताना रंगेहात पकडले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा भांडाफोड करून जादूटोणा विरोधी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला.


महत्वाच्या बातम्या