Pune Crime News :  दांडियामध्ये ओळख झालेली मुलगी बोलत नसल्याच्या रागातून एकाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी या घटनेनंतर अवघ्या दोन तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


आरोपी हा 22 वर्षीय तरूण असून त्याने हल्ला केलेली युवती ही अल्पवयीन आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी दांडियामध्ये या दोघांची ओळख झाली होती. मुलीच्या घरातल्या सदस्यांनी तिला या तरुणाशी बोलण्यास, संपर्कात राहण्यास मज्जाव केला. त्यानंतर या युवतीने या मुलाशी बोलणे सोडून दिले होते. अचानकपणे युवतीने बोलणं सोडून दिल्यामुळे आरोपी संतापला होता. रागाच्या भरात आरोपीने युवतीवर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात युवती जखमी झाली. युवतीवर हल्ला झाल्यानंतर आरोपी शहरातून पळ काढण्याच्या तयारीत होता. अखेर विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विमानतळ पोलिसांनी लोहगाव फॉरेस्ट पार्कमधून अटक केली. 


आरोपी हा पुण्यातील चंदननगर येथील संघर्ष चौकाजवळ राहणारा असून ज्ञानेश्वर निंबाळकर असे त्याचे नाव आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मृतदेह आढळला 


पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत निर्घृण खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पिंपरी सांडस येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि शील कापलेला मृतदेह सापडला आहे. या संपूर्ण प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मासेमारीचा व्यवसाय करणारे संतोष हे मंगळवारी भवरपूर येथून बहिणीला भेटण्यासाठी निघाला होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. मागील अनेक वर्षापासून संतोष हे भीमा व मुळा मुठा नदीवर मासेमारीचा व्यवसाय करत होते. दरम्यान अशाप्रकारे निर्घृण खून करण्यात आल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही संपूर्ण मृतदेह सापडला नाही. मृतदेहाचे दोन्ही पाय आणि एक हात गायब असल्याने पोलीसही चांगलीच चक्रावले आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास आता पुणे गुन्हे शाखा पोलीस देखील करत आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha