नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि कामगार नेते विजय कांबळे यांना 1 कोटी 70 लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे.


या भोंदूबाबाचं नाव उदयसिंग प्रतापराव चव्हाण उर्फ महाराज असं आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

कामोठे वसाहतीत राहणार्‍या या बाबाने केंद्रातील तसेच राज्यातील महामंडळावर वर्णी लावून देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय कांबळे यांच्याकडून 1 कोटी 70 लाख रूपये घेतले होते.

मात्र, पैसे देऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी आपली महामंडळावर वर्णी न लागल्याने विजय कांबळे आणि जितेद्र कांबळे यांनी उदयसिंग यांच्याकडे दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी तगादा लावला. मात्र उदयसिंग पैसे परत देत नसल्याचं पाहून माजी आमदार यांनी कामोठे पोलीस ठाण्यात सहा महिन्यापूर्वी उदयसिंग विरोधात तक्रार दाखल केली होती.