धुळे  : धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा कमी नोंदवण्यात येत आहे. याचा थेट परिणाम दुभत्या जनावरांच्या मेंदूवर होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता कमी झाली आहे. जी जनावरं दूध थंडी सुरू होण्यापूर्वी दहा लिटर देत होती तीच जनावरं आता सहा ते सात लिटर दूध देत असल्यामुळे जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर थेट वातावरणातील थंडीचा परिणाम जाणवू लागला असल्याने दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता जिल्हा पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


धुळे जिल्ह्यात थंडीचा कहर अद्यापही कायम आहे. यंदातर राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यामध्ये करण्यात आली आहे. 2.8 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानापर्यंत पारा धुळ्यामध्ये घसरताना बघावयास मिळाला. आणि याचा थेट परिणाम दुभत्या जनावरांच्या मेंदूवर झाल्याने या दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाली आहे. 


थंडीचा परिणाम दुभत्या जनावरांवर होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे जनावरांच्या खाद्याचे दर गगनाला भिडलेले असताना दुसरीकडे दुधाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर याचा फटका पशुपालकांना व दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.


थंडीमुळे दूध देणाऱ्या जनावरांच्या शरीरावर परिणाम जाणवू लागल्याने या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याने बाजारात देखील दुधाचा तुटवडा निर्माण होऊन दुधाचे दर कडाडण्याची शक्यता देखील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय विसावे यांनी व्यक्त केली आहे.


थंडीचा परिणाम जनावरांवर कमी होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता देखील वाढावी यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यामध्ये शक्यतो जनावरांना रात्रीच्यावेळी शेडमध्ये किंवा गोठ्यातच बांधावे, तसेच रात्रीच्या वेळी जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकावे, त्याचबरोबर गोठ्यामध्ये ऊब निर्माण व्हावी यासाठी शेकोटी पेटवावी व शक्यतो जनावरे शेडमध्ये बांधलेल्या ठिकाणी उघडी असलेली बाजू कापडाने किंवा आणखी पर्यायी मार्गाने झाकावी जेणेकरून हवा आत मध्ये येऊन जनावरांना थंडी जाणवणार नाही याची देखील काळजी पशुपालकांनी घ्यावी अशा पद्धतीने थंडीत देखील दुभत्या जनावरांची चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन वैद्यकीय विभागातर्फे दुभते जनावर पालकांना करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha