Attack on Police Station :  संबंधित परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यावरच काहींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. 


मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला. 


या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. 


समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत तोडफोड केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात किती कठोर कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha