Robbery in Kolhapur : कोल्हापूरात सध्या एका मेसेजची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा मेसेज चोरट्यांनी दरोडा टाकलेल्या घराच्या भिंतीवर लिहीला आहे. त्यामुळे या मेसेजची चर्चा कोल्हापूर शहरामध्ये वार्‍यासारखी पसरली आहे.  घरफोडी केल्यानंतर आपल्याला मोठा ऐवज किंवा मोठी रक्कम लंपास करता येईल, अशी चोरट्यांना अपेक्षा होती. मात्र, हातीच काही न लागल्याने नाराज झालेल्या चोरट्यांनी शिरजोरी दाखवत या घराचा मालक भिकारी असल्याचे लिहून पसार झाले.  


कोल्हापूरमधील आर.के.नगरमध्ये ही घटना उघडकीस आली. उमेश शेंडगे हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूरच्या आर. के. नगर येथील भारत माता कॉलनीत राहतात. त्याची दोन्ही मुले शिक्षण आणि नोकरी निमित्त परगावी आहेत. चार दिवसापूर्वी उमेश शेंडगे हे घरगुती कामानिमित्त आपल्या पत्नी समवेत कागल तालुक्यातील सोनाळी इथं गेले होते. या दरम्यान गुरुवारी रात्री अज्ञातांनी शेंडगे यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कुलूपबंद असलेल्या घरात मोठा ऐवज सापडेल अशी चोरट्यांना अपेक्षा होती. त्यातून त्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले. घरात शोधाशोध केली. मात्र, अपेक्षे इतकी त्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. चोरट्यांनी घरातील कपाट उघडून सगळं साहित्य विस्कटून टाकलं. अखेर त्यांनी पर्समधील सोन्याचं मंगळसूत्र आणि 7 हजाराची रोकड लंपास केली. 


या चोरट्यांना या बंगल्यात अपेक्षित मौल्यावान वस्तू न मिळाल्यानं त्यांचा अपेक्षाभंगच झाला. या घरातून जाताना चोरट्यांनी घरातील भिंतीवर या घरातील लोक भिकारी आहेत, असा मजकूर लिहून पसार झाले. 


दरम्यान, शुक्रवारी सायकाळी घरमालक उमेश शेंडगे हे परगावाहून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी उमेश शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha