LIVE UPDATES | प्रत्येक राजकीय पक्षांनी मराठा समाजाची मतं घेतली आता परतफेड करण्याची वेळ आली आहे : राजू शेट्टी

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Dec 2020 08:06 PM
दोन चिमुकल्या मुलींसह महिलेची आत्महत्या. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील पिराचा मळा परिसरातील घटना. सुप्रिया शिवाजी भोसले (वय 24), मृणाली शिवाजी भोसले (वय 5) व मृण्मयी शिवाजी भोसले (वय 4) अशी मृतांची नावे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, घटनास्थळी शिरोळ पोलीस दाखल. रेस्क्यू फोर्स आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने मृतदेह काढण्याचे काम सुरू.
प्रत्येक राजकीय पक्षांनी मराठा समाजाची मतं घेतली आहेत, आता परतफेड करण्याची वेळ आली आहे. राजू शेट्टी यांनी केलं मत व्यक्त. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने मनात आणलं तर आरक्षणावरची स्थगिती उठली जाऊ शकते.
घराच्या बाजुला लागुनच असलेल्या शेतात गांजाची झाडे लावली होती. ही गुप्त माहिती अंभोरा पोलिसांना समजाताच लवाजमासह गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेत सोळा किलो आठशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारखेल येथे घडली.

आष्टी तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथील सचिन साहेबराव जाधव याने घराच्या बाजुलाच लागुन असलेल्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना समजाताच पोलिसांनी फौजफाटा घेऊन जाऊन पाहणी केली असता शेतात गांजाची झाडे आढळून आली. यात 16 किलो 800 ग्रॅम किंमत 1 लाख 68 हजार 300 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील इराणी वस्ती असलेल्या पिराणी पाडा या ठिकाणी फरार आरोपीस पकडण्यासाठी आलेल्या नवघर वसई येथील पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तींनी हल्ला करून आरोपींना घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार भिवंडीत घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ला करणाऱ्यांमध्ये महिलांचा सुध्दा समावेश होता.
महाराष्ट्रचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं जातं. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो. तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव आहे. खंडेरायाच्या गडावर घटस्थापन करुन साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या “देवदिवाळी”ला आज उत्साहात सुरवात झाली. आज सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात पाकळणीला सुरुवात करण्यात आली. मार्तंड भैरवनाथासह उत्सव मूर्तींची पूजा अभिषेक करून नवीन पोशाख परिधान करण्यात आला. देवसंस्थानच्या वतीने मूर्तींना आभूषणे अलंकार परिधान करण्यात आले. चंपाषष्ठीनिमित्त मुख्य मंदिर, गाभारा आणि घटस्थापना स्थळ आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आला असून गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडावर सहा दिवस आणि रात्री “चंपाषष्ठी” हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पदाचा राजीनामा द्यावा',

कोल्हापुरातीलच भाजपच्या पाच माजी तालुकाध्यक्षानी केली राजीनाम्याची मागणी,

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवाला धरले जबाबदार,

जुन्या नेत्यांना वगळून नव्या नेत्यांवर अवलंबून राहिल्याने पराभव झाल्याचा आरोप
केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदराच्या विरोधात आज वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून मुंबई ते झाई पर्यंत बंदची हात देण्यात आली असून आज ह्या बंदला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो या बंदला मच्छिमार संघटनांसह इतर सामाजिक संघटनांनीही ही पाठिंबा दर्शवला असून पश्चिम किनारपट्टीवरील सर्व कोळी वाड्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय
चंद्रभागेच्या पात्रात बेकायदा वाळू उपसा करून भरधाव वेगाने निघालेल्या वाहनाने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला जोरदार धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी पतीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. चंद्रभागेच्या पुलावर व शेजारील 65 एकरात पहाटे फिरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते . मात्र येथे रोज लाखो रुपयांचा बेकायदा वाळू उपसा करणारी वाहने भरधाव वेगाने राजरोसपणे वाळू वाहत असतात. या सर्व प्रकाराला महसूल व प्रशासनाची मिलीभगत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते . यामुळेच वाळू माफिया मस्तवाल आणि उद्दाम बनले असून त्यांना नागरिकांच्या जिवाचीही आता पर्वा उरलेली नाही . यामुळेच आज भरले पती पत्नी 65 एकर भागात पहाटे फिरून पुन्हा गाडीवरून घराकडे जात असताना बिन नंबरच्या वाळूच्या वाहनाने त्यांना जोरदार धडक देत लांबपर्यंत फरफटत नेले. नागरिक पळत येताना दिसताच चालक गाडी सोडून पळाला.
मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत.
दानवेंची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या यवतमाळच्या संतोष ढवळे यांच्या विरोधात जालन्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दिलीय. शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात दानवे समर्थकांनी ढवळे यांनी सुपारी दिल्याची तक्रार केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची पोलिसांना विनंती केलीय. दोन दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख असलेल्या संतोष ढवळे यांनी दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाख रुपये आणि चार चाकी गाडी बक्षीस जाहीर केलं होतं.
मुंबई : शिवसेनान आमदार प्रताप सरनाईक यांनी खोट्या माहीतीवर ट्वीट करणाऱ्या कंगना रनौत आणि खोटी बातमी प्रसारीत करणाऱ्या न्यूज चँनल, प्रिटं मीडिया आणि डिजीटल मीडिया, सोशल मीडिया यांच्यावर हक्क भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थी,पालकांच्या मागणीनंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढवली
बीई/बी टेक,बी फार्मसी, एमबीए,एमसीए यासारख्या अभ्यासक्रमच्या ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सात दिवसांनी सीईटी सेलकडून वाढवली आहे
आज राज्यभरातील एपीएमसी मार्केट माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये माथाडी कामगारांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावताना ज्या माथाडी कामगारांचा मृत्यू झाला त्यांना 50 लाख रुपयांच्या विमा सुरक्षा कवचची रक्कम मिळावी. माथाडी मध्ये विविध पदावरील चेअरमन, सेक्रेटरी यांच्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात यासह विविध मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यत यामागणीसाठी आज एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. जर आज मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही लवकरच पूर्णपणे काम बंद आंदोलन करू असा इशारा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला साहित्यिक रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे यांनी दिला पाठिंबा, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांची साहित्यिकांवर टीका, राज्यतील साहित्यिक या परिस्थिती वर गप्प आहेत, प्रचलित व्यवस्थेला राज्यातील साहित्यिक घाबरतात, भूमिका घेत नाही, कोणी बोलत नाहीत, कांबळे यांची टीका
नाशिक : जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणा बरोबरच अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी पडत असल्याने जिल्हयातील कसमा पट्ट्यात अर्ली द्राक्षांना त्याचा फटका बसू लागला आहे. वाढती थंडी आणि पावसामुळे अनेक बांगांमधील द्राक्षांना निर्यात क्षम द्राक्षांना तडे गेलेय. तर द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता आहे. तर काही भागात द्राक्ष मणी मध्ये कुज आणि त्यांची गळ वाढली आहे. या वातावरणाचा मोठा आर्थिक फटका मात्र द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. तिकडे चांदवड तालूक्यात पुर्व भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्षांच उत्पादन घेणा-या द्राक्ष उत्पादकांची अशीच परिस्थिती असून, तेथे प्रमुख्याने डावणी रोगाचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे.
दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन सुरु असताना कृषी कायद्याचं समर्थन करण्यासाठी रयत क्रांती आणि भाजपच्या वतीने हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बळीराजाच्या फलकाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. केंद्रातील कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, त्यामुळे दलालांचे नुकसान होणार आहे. दिल्लीच्या सीमेवरचं आंदोलन शेतकऱ्यांचा नसून काँग्रेसचं आहे. अशी टीका यावेळी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांचीही उपस्थिती होती.

रायगड : उरण परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; माणगाव, अलिबाग भागात पावसाच्या हलक्या सरी ; खोपोली, महाड, नागोठणे, रोहा मध्येही पावसाची हजेरी
शिर्डी : संगमनेर तालुक्यातील 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कर्जुले पठार शिवारात झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन, रमेश काळे या तरुणाने गावापासून दूरच्या डोंगरावर जाऊन संपवली जीवन यात्रा, आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर 38 किलो गांजा जप्त, चार बॅगसह संशयित रित्या बसून आढळली व्यक्ती, बॅगच्या तपासणीत 38 किलो गांजा जप्त, या गांजाची एकूण किंमत 3 लाख 38 हजार, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन,

वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ,

कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात सुरू होते उपचार ,

महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धांचे विजेते ,

अनेक मल्ल घडवण्यात योगदान, कुस्ती क्षेत्रावर शोककळा,
परभणी जिल्ह्यात मागच्या आठवड्यापर्यंत तापमान हे 8 अंशपर्यंत घसरून जोरदार थंडी पडली होती. मात्र आज पहाटेपासूनच जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. भर हिवाळ्यात परभणीकरांना पावसाळ्याचा अनुभव मिळत आहे. परंतु सतत असलेले आभाळ आणि पाऊस यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात,दक्षिण मुंबईसह उपनगरामंध्ये पावसाची हजेरी, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यभरात ढगाळ वातावरण
करमाळा येथील नर भक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या सातत्याने अपयश येत असल्याने वन विभागाच्या मदतीला हर्षवर्धन तावरे हे बारामतीचे शार्प शूटर येणार आहेत. त्यांच्यासोबत दोन सहाय्यक असून यातील एक अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आहेत, वन विभागाने याला दुजोरा दिला आहे.
माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटिव्ह. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केली होती टेस्ट. पाचपुते यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील घरी क्वॉरंटाईन.
दिवंगत समाजसेविका डॉ.शीतल आमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आनंदवन येथे त्यांच्या समाधीस्थळी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या श्रद्धांजली सभेला पुन्हा एकदा आमटे आणि करजगी परिवारातील वादाची किनार दिसून आली. या श्रद्धांजली सभेला आनंदवनशी निगडित अनेकांनी प्रत्यक्ष आणि झूम ऍप्प द्वारे हजेरी लावली आणि डॉ.आमटे यांच्या बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र आमटे परिवारातील एकही व्यक्ती या सभेला उपस्थित नव्हता. डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सासू-सासरे म्हणजे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुक वर एक पोस्ट लिहून आमटे परिवारावर अनेक गंभीर आरोप केले होते. या पोस्टमुळे डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हे सर्व वाद बाजूला ठेवून आमटे कुटुंबीय या श्रद्धांजली सभेला हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र आमटे कुटुंबियांच्या गैरहजेरीमुळे हे वाद अजूनही कायम असल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले. मात्र फेसबुकवर लिहिलेल्या पोस्ट बाबत आणि आमटे कुटुंबियांच्या गैरहजेरी बाबत करजगी परिवाराने काहीही बोलण्यास नकार दिलाय.
"संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अप्रत्यक्षपणे नेत्यांचे कान टोचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरू साहिब यामधील संत नामदेव या विशेष आवृत्तीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर राज्यपालांनी संतांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले. राजा बदलले असतील, राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडे ही झाले असतील. मात्र देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत आहे. संतांच्या या कार्यामुळेच आपला देश वाचलाय. असे गौरवोद्गार काढतानाच "संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं राज्यपालांनी नमूद केलं. आजकाल मीच गुरू, मीच महात्मा असं म्हणणारे स्वतःची पूजा करावी म्हणून धिंडोरे पीठतात. त्यांना ही राज्यपालांनी शालजोडे लगावले. संत नामदेव, गुरू गोविंद सिंग यांसह देशातील प्रत्येक संतांनी दिलेली शिकवण सर्वांनी अंमलात आणावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
भाजपला ओबीसी समाजाचा पक्ष म्हणून ओळखलं जातं, ओबीसींमुळे पक्षाचा विस्तार झाला, जोपर्यंत ओबीसींचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही : देवेंद्र फडणवीस
पालघर : डहाणू-ठाणे-पुणे एसटी बसचा पाली विक्रमगड रोडवर वसुरी जवळ अपघात झाला आहे. यात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. पहाटेपासून जिल्ह्यात रिमझिम सुरू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत,त्यामुळे बसने स्लिप झाल्याने अपघात झाल्याचं समजतंय
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातही पावसाची शक्यता, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची भीती
मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलच्या टँकरला भीषण आग, मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील घटना, अग्निशमन दल, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून आजपासून आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं शेतकरी नेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. तसेच उद्यापासून उपोषणाला बसणार असल्याचंही शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत असताना जिओ विरुद्ध एअरटेल, व्होडाफोन-आयडीया वाद ट्रायच्या दारात


रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पत्र लिहून व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल विरोधात तक्रार दाखल केली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. टेलिकॉम सेक्रेटरी एस के गुप्ता यांना जियोने लिहिलेल्या पत्रात रिलायन्स जियोने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलवर आरोप करत म्हटलं आहे की, दोन्ही कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.


जिओने पत्रात आरोप केले आहेत की, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल उत्तर भारतातातील विविध भागांतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फायदा घेण्यासाठी या कंपन्या खोट्या प्रचाराचा आधार घेत आहेत. रिलायन्स जियोचं म्हणणं आहे की, यापूर्वी 28 सप्टेंबर, 2020 मध्येच जिओने ट्रायला एक पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला होता. परंतु असे असूनही या दोन्ही कंपन्यांनी कायदा असल्याचे भासवून आपली नकारात्मक प्रसिद्धी कायम ठेवली आहे.


आनंदाची बातमी... अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरण सुरु, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस


जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरु झालं आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस आहे.


कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ


कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणी वाढणाची शक्यता आहे. 102 एकरचा हा भूखंड एमएमआरडीएला मेट्रो कारशेडसाठी देताना जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशात त्रुटी असल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी आपला यासंदर्भातला निर्णय मागे घेत याप्रकरणाची नव्यानं सुनावणी घ्यावी. अन्यथा आम्ही त्या आदेशाबाबतच्या कायदेशीरबाबी पडताळून त्याची वैधता ठरवू असे स्पष्ट संकेत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. यावर उत्तर देताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितला की, सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं अधिकारी त्यात व्यस्त आहेत. यंदाचं हे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोनच दिवसांचं असल्यानं येत्या बुधवारी यावर राज्य सरकारच्यावतीनं उत्तर दिलं जाईल. तेव्हा हायकोर्टानं यावर बुधवारी सकाळी साडे 10 वाजता सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.


कांजूरमार्गमधील या भूखंडावर एका खाजगी विकासकानंही आपला दावा सांगत दिवाणी याचिका दाखल केलेली असताना त्याचीही बाजू जिल्हाधिका-यांनी ऐकणं आवश्यक होतं. कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्याची माहिती असूनही त्याकडे कानाडोळा करत जर जिल्हाधिका-यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल तर ते योग्य नाही, असं मत यावेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.