अकोला : अकोल्याच्या शासकीय बालगृहानं आज एक अतिशय भावनिक क्षण अनुभवला. आपल्या दीड वर्षांच्या काळजाच्या तुकड्याला एक आई तब्बल पाच महिन्यांनी भेटली. अकोला रेल्वेस्थानकावरून फेब्रुवारी महिन्यात या दीड वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. अखेर आज नागपूर बालकल्याण विभागानं या चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केलं. यावेळी आपल्या चिमुकल्याला पाहून आईच्या आसमंत भेदणाऱ्या आक्रोशानं उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाण्यावल्यात.
18 फेब्रुवारी 2020ची 'ती' रात्र. रेखाची त्या दिवशी माहेरी पंढरपूरला जाणारी रेल्वे चुकली. एवढ्या रात्री दर्यापूर तालूक्यातल्या आपल्या घरी पोहोचणंही तिलाही शक्य नव्हतं. आपल्या दीड वर्षांच्या सुमितला पोटाशी घेऊन ती रेल्वेस्थानकावरच झोपली. मध्यरात्री जेंव्हा तिला जाग आली, तेव्हा तिच्या काळजाचा तुकडा असलेला सुमित तिच्याजवळ नव्हता. तिनं आजूबाजूला खूप पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा हरवल्याची तक्रार तिनं अकोला रेल्वे पोलिसांत दिली. आणि या प्रकरणात मुलाचं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलीस तपासाची चक्रं फिरायला लागली. त्याबरोबरच रेखा आणि तिचा पती विजयनं आपल्या परीनं शेगाव, अकोला, बडनेरा, मुर्तिजापूर परिसरात मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती अपयशच आलं.
विजय आणि रेखा पवार हे दांपत्य अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालूक्यातल्या बाभळीचं... लोहार काम करणाऱ्या या दाम्पत्याला दोन मुली आणि दीड वर्षांचा सुमित नावाचा हा मुलगा. हातावर आणून पोट भरणारं हे कुटुंब. आपला मुलगा सापडणार की नाही?, या चिंतेत या दोघांचाही एक एक दिवस ढकलणं सुरु होतं. जसे-जसे दिवस जात होते. तसतशी मुलगा सापडण्याची शक्यताही अंधुक वाटत होती. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनंतर उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या होत्या. मात्र, 6 मेचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा ठरला. या दिवशी तिचा चिमुकला नागपुरातील रामझुला परिसरात आढळून आला.
अकोल्यातून नागपुरात कसा पोहोचला अपहृत चिमुकला :
18 फेब्रूवारीला रेखा आणि सुमित चिमुकल्यासह रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत झोपलेली होती. यावेळी येथे भिक मागणाऱ्या गीता मालाकार या महिलेची नजर या चिमुकल्यावर होती. मध्यरात्रीनंतर रेखा गाढ झोपेत असतांना गीतानं चिमुकल्या सुमितला तिच्या कुशीतून उचललं. यानंतर तिनं थेट नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीतून मुलासह पलायन केलं. तिनं या मुलाला नागपूरातील रामझुला भागातील एका झोपडपट्टीत ठेवलं होतं. मात्र, या काळात या चिमुकल्याचे प्रचंड हाल झाले. 6 मे रोजी हा चिमुकला रामझुला भागात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बेवारस खेळताना काही लोकांना दिसला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली. गणेशपेठ पोलिसांनी नागपूरच्या बालकल्याण समितीच्या मदतीनं या बालकाला ताब्यात घेतलं. यानंतर या चिमुकल्याची रवानगी 'मातृसेवा संघा'च्या शिशूगृहात करण्यात आली. तिथून काही दिवसांतच चिमुकल्या सुमितचं अपहरण करणाऱ्या आरोपी गीता मालाकारला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.
नागपूरच्या महिला-बालकल्याण समितीवर असंवेदनशीलपणाचा आरोप :
मात्र, या संपुर्ण प्रकरणात नागपुरच्या महिला आणि बालकल्याण समितीवर असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे. मुलगा 6 मे रोजी सापडल्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी समितीनं तब्बल दोन महिन्यांचा अवधी लावला. नागपूर बालकल्याण समितीनं असंवेदनशीलता दाखविल्यानं एका माय-लेकरांची भेट व्हायला तब्बल दोन महिन्यांचा अवधी लागला. ही दिरंगाई नागपूर बालकल्याण समितीच्या असंवेदनशीलतेमुळे झाल्याचा आरोप अकोला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी केला आहे.
नागपूरच्या महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांची सुहृदयता :
एकीकडे बालकल्याण समितीवर असंवेदनशीलपणाचा आरोप होतो आहे. मात्र, याच प्रकरणात नागपुरच्या महिला आणि बालकल्याण अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्यातील संवेदनशील 'आई'चं दर्शन या प्रकरणात झालं आहे. आज अकोल्याला या बालकाला कोल्हे यांनी स्वत:च्या खर्चानं पाठविलं. या मुलासमवेत अकोल्याला गेलेल्या पथकात जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण विनोद शेंडे आणि वाहनचालक मोरेश्वर मडावी यांचा समावेश होता.
दरम्यान, देशात दरवर्षी रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात लहान मुलं चोरीला जातात. त्यातील अनेकांचा पुढे पत्ताही लागत नाही. मात्र, प्रत्येकाचं नशिब रेखा आणि विजय या माय-बापांसारखं बलवत्तर नसतं. त्यामुळे प्रवासात लहान लेकरांना सांभाळा. कारण, तूमच्या आसपास त्यांचे शत्रू असण्याची शक्यता अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सांगोल्यात फॉर्च्युनरपेक्षा महाग मेंढा, पिल्लालाच 10 लाखांची किंमत
धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा
राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा