औरंगाबाद : बजाज ऑटोच्या औरंगाबादमधील प्लांटमध्ये 403 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडले असल्याचा दावा युनियनकडून करण्यात येतोय. युनिअनकडून तात्पुरता प्लांट बंद करण्याची मागणी देखील समोर येत असल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना बजाज ऑटो वर्कर्स युनिअनचे अध्यक्ष बाजीराव थांगडे यांनी दिली आहे.



देशात मार्च महिन्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. अद्यापही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी अनेक निर्बंध शिथील करण्यात आले. महाराष्ट्र कंपन्यादेखील सुरु करण्यास परवानगी मिळाली. कंपन्या सुरु झाल्यानंतर महिनाभरानी बजाज ऑटोमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्यास सुरवात झाली. कंपनी युनियनच्या दाव्यानुसार, आज बजाज कंपनीमध्ये 403 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


मात्र 26 जून रोजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फॅक्टरीमधील आठ हजार कर्मचाऱ्यांपैकी 140 जणांना करोनाची लागण झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीने काम थांबवू शकत नसून, व्हायरससोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलं आहे. औरंगाबादमधील वाळूज येतील प्लांटमधील संघटनेन दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णांचा आकडा सध्या 403 वर गेला आहे. बजाजकडून मात्र अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


बाजीराव थेंगडे म्हणाले की, 'आम्ही कंपनीकडे करोनाची साखळी तोडण्यासाठी 10 ते 15 दिवसांसाठी प्लांट बंद ठेवण्याची विनंती युनियनमार्फत केली. पण कंपनीकडून मिळालेल उत्तर असं आहे की, यामुळे कोणताही फायदा होणार नाही.'


बजाजच्या भारतामधील एकूण प्रोडक्शनपैकी 50 टक्के प्रोडक्शन वळूज प्लांटमध्ये होतं. वळूज प्लांटमध्ये दरवर्षी 30 लाख 30 हजार मोटर बाइक आणि इतर वाहनांची निर्मिती होते. बजाज कंपनी कामगारांसाठी सुरक्षेचे सर्व नियम पाळत आहे. मात्र ते पुरेसं नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. असेम्बली लाइनवर अनेक लोक एकाच इंजिनला हात लावतात. आम्ही ग्लोव्ह्ज वापरत असलो तरी त्यामुळे संसर्ग होणार नाही. याची शक्यता फार कमी आहे, असं रुग्णालयात दाखल एका कर्मचाऱ्यांने सांगितलं आहे.


औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने येत्या 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला पन्नास टक्केच पगार देईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यातही कंपनीकडून लॉकडाऊन जाहीर झालेल्या तारखेच्या आधी दोन दिवस आणि लॉकडाऊन संपल्यानंतर दोन दिवस उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. जे या अटीत बसणार नाही. त्यांना मात्र 50% पगारही मिळणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आल्याचं ठेंगडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या कंपनीच्या निर्णयाला देखील आपला विरोध असल्याचं थेंगडे म्हणाले. याबाबत आम्ही कंपनीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकृत माहिती कंपनीकडून मिळू शकली नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद


गडचिरोलीत गरोदर मातेची 23 किमी पायपीट, प्रसुतीसाठी नदी नाल्यातून प्रवास


'त्यांना विद्यार्थांच्या जीवाची काळजी नाही का?'; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा केंद्र सरकारला सवाल