(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांची स्मार्ट आयडिया
बाजारांमधील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी मुंबईतील मैदानांमध्ये बाजार भरवण्याचे प्रयोग सुरु केले आहेत. त्यामुळे गर्दीचं विभाजन होऊन, गर्दी कमी होऊन लोकांमधील अंतरही वाढत आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी ही कल्पना प्रभावी ठरत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र काही ठिकाणी गर्दी कमी होताना दिसत नाही. फळे, भाज्या, औषधं आणि किराना मालाची दुकानं यांना सरकारने लॉकडाऊनपासून दूर ठेवलं आहे. मात्र यामुळे बाजारात लोकांची गर्दी होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या गर्दीला रोखण्यासाठी एक उपाय शोधला आहे. मुंबईतील रिकाम्या असलेल्या मैदानांमध्ये बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन लोकांचा गर्दी जास्त होणार नाही.
मुंबईतील डोंगरी हा गर्दीचा परिसर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीची घोषणा केल्यानंतरही येथे गर्दी पाहायला मिळत होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील बाजार मोकळ्या मैदानांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे भाजी आणि फळ विक्रेत्यांना मैदानात जास्तीची जागा उपलब्ध होईल आणि गर्दी पसरवण्यासही मदत होईल. लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, ठराविक अंतर लोकांमध्ये असावं, यावर नजर ठेवण्यासाठी याठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी याविषयी म्हटलं की, आधी आम्ही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतलं. त्यानंतर फळ, भाजी आणि इतर जीवनावश्यक वस्तू विक्रेते बसतील यासाठी मैदानं निवडली. या मैदानांमध्ये विक्रेते एक ते दोन मीटर अंतरावर बसतील अशा जागा निश्चित करुन दिल्या. आता उघड्या मैदानात विक्रेत्यांना आणि नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने मंडपाची व्यवस्थाही पोलिसांनी केली आहे.
डोंगरी परिसरातील विक्रेते आणि नागरिक यांनी पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. सरकारने घालून दिलेल्या नियमांचं आम्ही पालन करु. त्यामुळे सर्व विक्रेते मास्क लावतात आणि प्रत्येक ग्राहकांनाही मास्क लावण्याचा आग्रह करतात. डोंगरीप्रमाणे इतर परिसरातही पोलीस असे प्रयोग करत आहेत. मुंबईतील अनेक मैदानांचा यासाठी विचार केला जात आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी केलेली ही आयडिया खरंच प्रभावी ठरू शकते आणि नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचं आहे, तरच कोरोना विरुद्धची ही लढाई आपण लवकराच लवकर जिंकू शकतो.
संबंधित बातम्या : Coronavirus | जगभरात कोरोनाचा हाहाकार! इटली, अमेरिकेत मृत्यूतांडव सुरूच Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावाIndia Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड