Coronavirus Maharashtra Live Updates | रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता
Coronavirus in Maharashtra Live : राज्यात बुधवारी (29 एप्रिल) कोरोनाच्या 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि सोलापूर, औरंगाबाद, पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 432 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 205 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 May 2020 08:30 AM
राज्यातील किंवा परराज्यातील नागरिकांना आपल्या मूळ गावी जाऊ देण्याचं राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु काही राजकीय पक्ष हे त्यांच्याकडे अर्ज करा असे म्हणत आहे. याची कोणतीही गरज नसून आपण संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज करा.
-गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 2 दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पाऊस बरसत होता. त्यात हा पाऊस आत पुढील 2 मे पर्यंत पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा देखील सुटेल, शिवाय मागील 2 दिवसापासून जिल्ह्यातील वातावरण देखील ढगाळ आहे.
जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.
मालेगावच्या खड्डा जीनमधील सूत गोदामाला लागली भीषण आग. आगीत गोदमातील सूत जाळून खाक. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. मालेगाव महापालिकेचे बम्ब घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्यातील नऊ विधान परिषद 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली आहे.
पालघर तालुक्यात बोईसर येथील कोरोना पॉझिटिव्ह 35 वर्ष व्यक्तीच्या तसेच पालघर येथे 57 वर्षीय परिचारिकेच्या उच्च जोखीम संपर्कातील 40 ते 45 व्यक्तींचा अहवाल नकारात्मक आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील काही अहवाल प्रतीक्षेत असले तरी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 583 ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या 10,498 आहे. तर दिवसभरात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारावर गेला आहे.
आरोग्य स्वयंसेविकांच्या मानधनात दरमहा 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण मानधन 9 हजार रूपये मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक दिवसासाठी दररोज 300 रुपयांचे विशेष अतिरीक्त मानधन
दिले जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविकांना याचा लाभ होणार आहे.
कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यात आता आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची भर पडली असून, हे कारागृहही तातडीने लॉक डाऊन करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी; तालुक्यातील शेवटचा रुग्णही कोरोनामुक्त. त्यामुळे सध्या बारामतीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. बारामती पॅटर्नला मोठं यश.
आंतरराज्य सीमेवर वाहतुकीला स्थानिक प्रशासनाकडून अडथळे येत असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कान उघडणी. सेपरेट परवान्याची गरज नसल्याचा गृह मंत्रालयाचा निर्वाळा. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चालू राहावी यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना पुन्हा निर्देश.
युजीसी ने दिलेल्या गाईडलाइन्स या राज्यच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या असून एफ वाय आणि एस वाय च्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान घेण्यात याव्यता शिवाय 12 वी निकाल लागल्यानंतर प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन 1 सप्टेंबर पर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष सुरू कराव्यात अशा सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत
राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षाबाबतचा निर्णय 2 ते 3 दिवसात घेणार; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती.
लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील.
जळगाव येथील कोरोना संसर्ग कक्षात दाखल असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा आज दुपारी एक वाजता मृत्यू झाला आहे. या रुग्णास 25 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्याचा कोरोना तपासणी अहवाल 28 एप्रिल रोजी रुग्णालयास प्राप्त झाला आहे. सदरचा रुग्ण हा अमळनेर येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता दहा इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
अमरावतीत आज दिवसभरात 12 जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. आता नालसाबपुरा आणि लालखडी येथील पाच जणांना कोरोनाची लागण. जिल्ह्याची एकूण संख्या गेली 40 वर.
अनेक ठिकाणी लॉकडाऊन यशस्वी झाल्याने कोरोना संसर्गचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड 1 जून 2018 पासून नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या नोंदणी कार्ड नुतनीकरणाची अट शिथिल करण्यात यावी व यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजूरांना दिलासा द्यावा अशी विनंती राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारांसाठी सुरुवातीला 19 लोकांना परवानगी देण्यात आली होती पण त्यानंतर पुन्हा पाच लोकांना स्पेशल परवानगी देण्यात आलेली आहे असे एकूण चोवीस लोकांनी अंत्यसंस्कार करतेवेळी हजेरी लावलेली आहे
कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत,उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 20 वर पोहोचलीय. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांणा अजिबात गंभीर्य नाही. वरून रस्त्याने चालता चालता थुंकीच्या पिचकाऱ्या मारणाऱ्यांची तर संख्या बोटांवर ही मोजता येत नाही. मात्र, आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणे करणे एका दुचाकी चालकास चांगलेच भोवले आहे. वाहतुक शाखेच्या पोलिसांनी त्याला थुंकलेली जागा हाताने पुसायला लावून त्याच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल केला आहे. या अजब कारवाईने पिचकारी मारणाऱ्यांचे मात्र आता धाबे दणाणले आहेत.
पुणे शहरातील संचारबंदी आज 30 तारखेला संपत होती. परंतु पुणे पोलिसांनी आदेश काढून ही संचारबंदी तीन तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या काळात पुण्यातील दहा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जे भाग अतिसंक्रमणशील म्हणून जाहीर करण्यात आलेत तिथं दुध विक्री करणारी दुकानं सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सुरू राहतील तर घरपोच दुध पुरवठा करण्यासाठी या क्षेत्रात सकाळी सहा ते दहा ही वेळ नेमून दिली आहे. पुण्यातील इतर भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ असेल.
कोरोनाच्या विरोधात सरकारतर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांसाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील आदिवासी सेवा मंडळाने एक लाख एक हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन आपलं सामाजिक कर्तव्य बजावलं आहे. चोपडायेथील धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भादले, सचिव ज्ञानेश्र्वर भादले आणि संचालक मंडळाच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना हा मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला आहे. सातपुडा पर्वत रांगांच्या मध्ये अनेक आदिवासी पाड्यांवर सुद्धा आदिवासी सेवा मंडळाने गरजू आदिवासी साठी अन्नाची सोय करून दिल्याने आदिवासी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने वॉकहार्ट रुग्णालय बंद करण्यात आले होते.
सध्या केवळ कोरोना पेशंटच्या क्रिटीकल केअरसाठी हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी येथे 30 बेडस् उपलब्ध आहेत.
येथे प्लाझ्मा थेरपी संदर्भातही परवानगी आणि तपासणी प्रक्रीया सुरू आहेत.
रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून वोक्हार्ट रुग्णालय मर्यादित स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले आहे.
पालघर जिल्हयातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी पहिल्या केस मधील 101 आरोपींना डहाणू न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर याच आरोपींना दुसऱ्या केसमध्ये तपासासाठी 14 दिवसांची 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले असून पहिला गुन्हा जमावकडून साधूंना वाचवताना पोलिसांवर हल्ला केल्याचा असून दुसरा गुन्हा हा खुनाचा तर तिसरा गुन्हा आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांवर हल्ला केल्याचा आहे. सदर आरोपी हे खुनाच्या गुन्हा खाली अटक केले होते. त्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
औरंगाबाद 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 144 वर पोहोचली आहे. तर 23 जण कोरोना मुक्त झाले असून कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामाच्या संदर्भात हा संवाद होणार आहे.
सांगलीतील कडेगावच्या खेराडी वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या त्या मृत व्यक्तीबाबत सायन हॉस्पिटलकडून खुलासा प्राप्त झाला. संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना आजाराने झाला नव्हता, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तरीही याबाबत जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून संबंधित व्यक्तीच्या ज्या 36 निकटवर्तीयांना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशन क्वॉरन्टाईन केलं आहे, त्यांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यावर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करावं की होम क्वॉरन्टाईनमध्ये ठेवावं याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली.
लॉकडाऊनच्या काळात सध्या इंधन विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत आले आहेत. त्यामुळेच राज्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी फामपेडाने तेलं कंपन्यांकडे केली आहे. सध्या पेट्रोलच्या विक्रीत देखील घट झाली आहे. पण, खर्च मात्र तेवढाच आहे. कामगारांचे पगार, विजेचं बिल यामध्ये कोणतीही कमी नाही. मे महिन्यात पेट्रोल पंच चालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी ते करत आहेत.
मालेगावमध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून एकाच दिवसात तब्बल 82 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 253 वर गेला असून नाशिक जिल्ह्यातील आकडेवारी 276 झाली आहे. हॉटस्पॉट मालेगावची स्थिती आता दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. 82 नव्या रुग्णांमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे, तर याआधी काही डॉक्टरआणि आरोग्य सेवकांनाही लागण झाली आहे. त्यामुळे मालेगाव कोरोना मुक्त करण्याचं खूप मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. कालच गृहमंत्री, आरोग्य मंत्री यांनी नशिकमध्ये मालेगावच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. त्याच दिवशी तब्बल 82 रुग्ण आढळल्याने प्रशासनापुढे मोठं संकट उभे आहे.
पार्श्वभूमी
Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात बुधवारी (29 एप्रिल) कोरोनाच्या 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 3 आणि सोलापूर, औरंगाबाद, पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 432जणांचा मृत्यू झाला आहे. काल 205 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात पाठवण्यात आलेल्या 1 लाख 37 हजार 159 नमुन्यांपैकी 1 लाख 26 हजार 376 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 9915 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 62 हजार 860 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 10 हजार 813 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1593 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 25 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 15 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 18 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 9915
मृत्यू - 432
मुंबई महानगरपालिका- 6644 (मृत्यू 277)
ठाणे- 46 (मृत्यू 2 )
ठाणे महानगरपालिका- 373 (मृत्यू 4)
नवी मुंबई मनपा- 162(मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 158 (मृत्यू 3)
उल्हासनगर मनपा - 3
भिवंडी, निजामपूर - 15
मिरा-भाईंदर- 125 (मृत्यू 2)
पालघर- 41 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 128(मृत्यू 3)
रायगड- 23
पनवेल- 46 (मृत्यू 2)
नाशिक - 5
नाशिक मनपा- 19
मालेगाव मनपा - 171 (मृत्यू 12)
अहमदनगर- 26 (मृत्यू 2)
अहमदनगर मनपा - 16
धुळे - 8 (मृत्यू 2)
धुळे मनपा - 17 (मृत्यू 1)
जळगाव- 30 (मृत्यू 8)
जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1)
नंदुरबार - 11 (मृत्यू 1)
पुणे- 58 (मृत्यू 3)
पुणे मनपा- 1062(मृत्यू 79)
पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)
सातारा- 32 (मृत्यू 2)
सोलापूर- 7
सोलापूर मनपा- 78 (मृत्यू 6)
कोल्हापूर- 7
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 28
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 2
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद -2
औरंगाबाद मनपा- 103 (मृत्यू 7)
जालना- 2
हिंगोली- 15
परभणी मनपा- 1
लातूर -12 (मृत्यू 1)
उस्मानाबाद-3
बीड - 1
नांदेड मनपा - 3
अकोला - 12 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 27
अमरावती- 2
अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7)
यवतमाळ- 79
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 2
नागपूर- 6
नागपूर मनपा - 132 (मृत्यू 1)
भंडारा - 1
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 703 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9811 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 40.43 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.
( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)