Coronavirus Fourth Wave : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळत आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. चीनसारख्या देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ग्लोबल रुग्णालयाचे संसर्गजजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर हरीश चाफळे यांनी राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘जूनमध्ये राज्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. पण ती लाट सौम्य असेल, असे हरीश चाफळे म्हणाले.’


पुढील तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते. पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल.


चीन आणि दक्षिण कोरीयातील रुग्णवाढीचं कारण ओमायक्रॉन व्हेरीयंट आहे. कोणत्याही महामारीमध्ये लाटा येत राहतात. अशातच, हा व्हेरीयंट वेगाने पसरत असल्यानं चीन आणि दक्षिण कोरीयाने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. भारताबद्दल बोलायचं तर ‘वी आर बेटर प्लेस’. दुसऱ्या लाटेमुळे लोकांना इमुनिटी आलेली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार झाला मात्र लोकांना अधिक त्रास जाणवला नाही. बाकी देशांपेक्षा भारतातील नागरिकांची इम्युनिटी बरी आहे. सोबतच लसीकरण देखील चांगलं होतंय. मात्र याचा अर्थ असा नाही की कोव्हिड नियम नाही पाळले तरी आपण हे थोपवू शकू. कोणतीही लाट दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचव्या लाटेनंतरच गोष्टी आटोक्यात येत असतात. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. मास्क घाला, नियम पाळा, असे चाफळे म्हणाले. 


पण काळजीची बाब म्हणजे, कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्यास भारतात नव्या लाटेची शक्यता आहे.  चीन, जर्मनी, अमेरिका आणि बाकी देशांच्या रिपोर्टनुसार नवी लक्षणे अद्याप नाही. मात्र अधिक वेगाने पसरतोय. त्यामुळे येणारे पुढील 15 दिवसात कळेल की कसा हा वाढतोय. कुठल्याही लाटेचा अंदाज सांगणं कठीण आहे. पण जूनच्या मध्यपर्यंत भारतात कोरोनाच्या लाटेची शक्यता आहे. मात्र, ही लाट अतिसैम्य असेल. कुठल्या व्हेरियंटला कुठली लस दाद देणार नाही अथवा देईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. मात्र लसीमुळे आजाराची तीव्रता आपण कमी करु शकू, सोबतच मृत्यूदरही कमी होतो, असे चाफळे यांनी सांगितले.