Onion Rates : रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य (Russia-Ukraine War) परिस्थतीमुळं बाजारात महागाईचा (Inflation) भडका उडालाय. पण कांद्याचे दर (Onion Rates) मात्र कमालीचे गडगडले आहेत. ही परिस्थिती उद्भवल्याने या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलंय. कांद्याचे दर अचानकपणे 14 ते 15 रुपये प्रति किलोने नेमके का घटले? जाणून घेऊया. 


कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवतोय


गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प होत्या. बाजारपेठा ठप्प असताना देखील शेतकरी शेतात राबत होता. त्यात कांदा उत्पादक देखील मागे नव्हते. कोरोना काळात शेतकऱ्यांना त्यांचा कांदा सरासरी 5 रुपये किलोने विकावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र असं असलं तरी कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कांद्याचे दर हे प्रतिकिलो 8 ते 10 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवतोय.


हातातोंडाशी आलेला घास गेला


साताऱ्याच्या पिंपरद गावचे कांदा उत्पादक शेतकरी चंद्रकांत माने सध्या चिंताग्रस्त आहेत. अवकाळी पावसामुळं त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं होतं, पण त्यावर त्यांनी मात केली, पुन्हा घाम गाळून तीन एकर क्षेत्रात कांदा पिकवला. आता आपण मालामाल होऊ, या आनंदात असतानाच कांद्याचे दर मात्र अचानकपणे गडगडले. त्यामुळे ज्या पिकासाठी त्यांनी सव्वा दोन लाख खर्ची घातले, त्या हातातोंडाशी आलेल्या या पिकातून आता मुद्दल मिळण्याची ही शक्यता धूसर झालीये.  दहा दिवसांपूर्वी 22 ते 30 रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण अचानकपणे 10 ते 13 रुपये प्रति किलो असे दर नेमके का घटले? याची कारणं आम्ही पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन जाणून घेतली.


रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळं महागाईचा भडका


कांदा खरेदी-विक्रीसाठी भारतात दोन नंबरची बाजार समिती म्हणून पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीला ओळखलं जातं. म्हणूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक आठवड्याला 25 ते 30 हजार क्विंटल कांद्याची आवक या बाजार समितीत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत हा कांदा देशातील विविध बाजार पेठेत दाखल होतो. पण होळीमुळं अनेक बाजारपेठा बंद आहेत, त्याशिवाय इथला परप्रांतीय मजूर होळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी गेला. त्यामुळे देशातील बाजारातून कांद्याची मागणी घटली, परिणामी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळं महागाईचा भडका उडवलाय. त्यामुळे कांदा ही भाव खाईल अशी अपेक्षा होती. पण होळीच्या सणाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा अक्षरशः भंग केला.


संबंधित बातम्या


Heatwave in Maharashtra : पारा वाढला, महावितरणला घाम फुटला; जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ


Inflation : होळीच्या तोंडावर महागाईचा भडका! चिकन, मिरची, मॅगी, अंडी आणि बरंच काही...