बीड : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. एक-दोन रुपये किलो दराने शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे.


बीडजवळील नागापूरमधील भाजीपाल्याचे शेतकरी भास्कर खराडे यांनी आपल्या शेतात पत्ता कोबीची लागवड केली आहे. मात्र ज्या पत्ताकोबीसाठी आतापर्यंत 30 ते 35 हजार रुपये खर्च केला आहे, आजचा बाजाराचा भाव बघता यातून त्यांना पाच ते दहा हजार रुपये तरी मिळतील की नाही याची शंका आहे. भास्कर खराडे यांच्यासारखी स्थिती सर्वच शेतकऱ्यांची आहे.


दुष्काळ आणि गारपीट या नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता कोरोनाचं उभं राहिलं आहे. भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा घेऊन काही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आठवडी बाजर बंद झाल्याने किरकोळ विक्रेते देखील अडचणीत आहे.


बीडच्या बाजारातील आजचे भाव


गाजर - 3 रुपये किलो
कोबी - 5 रुपये किलो
काकडी - 2 रुपये किलो
गवार - 10 रुपये किलो
मेथी - 30 रुपये 100 जुड्या
कोथिंबीर - 50 रुपये 100 जुड्या
पालक - 50 रुपये 100 जुड्या
टोमॅटो - 2 रुपये किलो
वांगी - 5 रुपये किलो
करले - 5 रुपये किलो
भेंडी - 7 रुपये किलो


कोरोना व्हायरसच्या अफवांमुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसायावर वाईट परिणाम झाला. त्याहीपेक्षा जास्त वाईट परिणाम हा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यावर होताना पाहायला मिळत आहे. यावर्षी निसर्गाने साथ दिली रबी हंगामात पुरेसे पाणी उपलब्ध होते. मात्र कोरोनाचं संकट आल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.


संबंधित बातम्या :