नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.


मोदी सुरुवातीला म्हणाले की, मी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु, असं ते म्हणाले.


ते म्हणाले की, मागच्या दोन महिन्यांपासून आपण कोरोनाबाबत विविध बातम्या ऐकतो आहोत आणि पाहतो आहोत. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचं मला कौतुक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालं की आपण संकटापासून आपण सध्या वाचलो आहोत. सगळं काही ठीक आहे मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणं आवश्यक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.


जनता कर्फ्यूमध्ये करायचं काय?


मोदी म्हणाले की, रविवारी, 22  मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल असे मोदी म्हणाले. हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असं मोदी म्हणाले.