मुंबई : कोरोनाच्या विषाणू थंड वातावरणात जास्त काळ टिकतो. त्यामुळे हा धोका पाहता कार्यालय आणि घरातील एसीचा वापर कमी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. या संदर्भात राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. एसीच्या वापरावर सरकारने काही मर्यादा घालण्याचं आवाहन केलं आहे.
थंड वातावरणात कोरोना विषाणूंचं आर्युमान जास्त असतं. याशिवाय एसीच्या हवेतून कोरोनाचे विषाणून जास्तीत जास्त पसरु शकतात. त्याद्वारे इतरांच्या नाका-तोंडावाटे हे विषाणू शरीरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसी ऐवजी फॅनला जास्त प्राधान्य द्यावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. कडक उन्हामध्ये हे विषाणू फार काळ टिकत नाहीत.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वरुन 63 वर
राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे.
नवीन 11 रुग्णांपैकी 8 जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
...तर लोकल सेवा बंद करावी लागेल
मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लोकं कामानिमित्त बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकं बाहेर पडणार नाहीत यासाठी, काही सेवा बंद करण्यावर सरकारने भर दिला. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेस्टिंग लॅब्स वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्य सरकार मेडिकल कॉलेजमध्येही लॅब्स उभारण्यास तयार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना याबाबत विनंती केली आहे. राज्यात लॅब्स वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 10
- मुंबई - 21
- नागपूर- 4
- यवतमाळ - 3
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 3
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या :
- #JantaCurfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा
- Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती