मुंबई : कोरोनामुळं महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती देणारं बनावट पत्रक सध्या व्हायरल होतंय. मात्र त्या पत्रकावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण तसं कोणतही पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावानं हे पत्रक व्हायरल केलं जातं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेत कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. मात्र या पत्रकावर आणि अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.

या फेक पत्रात काय दिलंय
या फेक पत्रात महाराष्ट्र, गुजरात, सिक्किम आणि उत्तर प्रदेशमध्ये 14 ते 21 मार्च दरम्यान शाला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळा बंद न ठेवल्यास 5000 दंड होईल असा इशारा दिला आहे. हे पत्र व्हायरल होताच राज्यांमधल्या आणि तेही सिलेक्टिव्ह राज्यात केंद्र सरकार सुट्ट्या कसं काय जाहीर करेल? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारने तात्काळ याची दखल घेत सदरील परिपत्रक हे खोटे असल्याचे सांगितलं आहे.

#CoronaVirus | महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य सरकारचं आवाहन

महाराष्ट्रसह अन्य चार राज्यांमध्ये 14 ते 21 मार्च सुट्टी जाहिर करण्याबाबत केंद्र शासनाच्या पत्राचा हवाला देऊन बातमी दिली जात आहे. हे पत्र फेक असून राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे या पत्रावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले सदरील परिपत्रक हे खोटे असून अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात सायबर पोलिसांकडे शासनातर्फे तक्रार करण्यात आली असून तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.



#CoronaVirus | सॅनिटायझरचा तुटवडा, मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत आठपट मागणी वाढली 

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.