मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांतील घटनांमधून याचे संकेत मिळतायेत. ऑक्टोबर 2019 मध्ये एकत्र निवडणूक लढल्यानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. मात्र, सध्या भाजपच्या काही नेत्यांची वक्तव्य पाहाता ते शिवसेनेबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एनआरसीवर घेतलेल्या भूमिकेने या चर्चांना अधिक उधाण आलंय.


भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला, ही आमची चुक असल्याचं वक्तव्य अर्थसंकल्पातील चर्चेवेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पुढे ते म्हणाले, की मान्य आहे आम्ही चूक केली. मात्र, भविष्यात ही चूक सुधारली जाऊ शकते. पण, याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेणं चुकीचं होतं. सभागृहातील मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याने भाजपची शिवसेनेविषयी भूमिका सौम्य होत असल्याचं दिसून येतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी
मागच्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला आपलं समर्थन असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. लोकसभेत हे विधेयक पास होत असतानाही शिवसेनेने याचं समर्थन केलं होतं. मात्र, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा विरोध पाहता, राज्यसभेत हे विधेयक पास होताना सेनेने मतदानात भाग घेतला नव्हता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याचं मुख्यमंत्र्यांनी उघड समर्थन केलं. यावरुन भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढत असल्याचं दिसून येतंय.

अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय, तर पश्चिम महाराष्ट्रावर सरकार मेहरबान : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तकाचे प्रकारशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत या पुस्तकाचं प्रकाशन मला फडणवीस यांच्यामुळे करावं लागतय, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. याचा अर्थ त्यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं, तर ते स्वतः आज मुख्यमंत्री असते. शिवसेना आणि भाजपने 2019 ची विधानसभा निवडणूक युतीतर्फे लढले होते. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष विभागून घ्यावे, अशी सेनेची मागणी होती. युतीअगोदर मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. मात्र, असा कोणताच करार आमच्यात झाला नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावर नाराज होत, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांहून अधिककाळाची युती तोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली.

मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!

महाराष्ट्रात सत्तेसाठी भाजपकडून हालचाली
महाराष्ट्र राज्य हे सर्वचं दृष्टीने खूप महत्वाचे राज्य मानले जाते. बऱ्याच ठिकाणी बहुमत नसताना भाजपने सत्ता मिळवली आहे. मात्र, राज्यात बहुमत असताना भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडीमध्ये सुसंवाद नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हे सरकार पडेल आणि शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात पुन्हा सरकार स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला वाटत असल्यांचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे.

Ajit Pawar-Sudhir Mungantiwar | मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!