नागपूर : महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. सोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीजबिल प्राप्त होईल.


नितीन राऊत यांच्या सूचनेप्रमाणे महावितरणने मार्च महिन्याचे बिल भरण्यास 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.


कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे. सोबतच वीजबिलांची छपाई व वितरण देखील बंद करण्यात आले आहे. तसेच वीजबिल भरणा केंद्र देखील बंद आहेत. तथापि, महावितरणच्या कन्झुमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपमधील लॉगिनद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असा ‘एसएमएस’ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या राज्यातील 2 कोटी 10 लाखांपेक्षा अधिक वीजग्राहकांना पाठवण्यात येत आहे.


वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठवल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जे ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठवणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठवण्यात येईल. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येईल व मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे.


'लॉकडाऊन'मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठवण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.


संबंधित बातम्या 

Coronavirus | WEB Exclusive | PPE Kit म्हणजे नेमकं काय? उत्तम क्वॉलिटीचे पीपीई कीट वापरणं का आवश्यक?