शिर्डी : जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा काढण्यात आली. या साई परिक्रमेत ग्रामस्थ तसेच देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सामिल झाले होते. 14 किलोमीटर अंतर पार करत साई परिक्रमा यात्रा द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर समाप्त झाली. विशेष म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गर्दी करू नका असं आवाहन करत असताना त्यांच्याच पक्षाचे खासदार सदाशिव लोखंडे हे परिक्रमेत सहभागी झालेले दिसून आले.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यभरातील सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर गर्दी रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येतेय. असं असतानाही शिर्डीत साई परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं. रात्री उशिरा प्रांताधिकारी यांनी साई परिक्रेमच्या कार्यक्रमास परवानगी रद्द केल्याचं जाहीर केलं होतं. साई परिक्रमेचे आयोजक ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डीच्या वतीने देखील परिक्रमा स्थगित केल्याचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र सकाळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि देशभरातील आलेल्या भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना या माध्यमातून केल्याचं स्थानिक भाविकांनी सांगितलं.

या साई परिक्रमा यात्रेत शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते, महंत रामगिरी महाराज, काशिकानंदजी महाराज, माजी विश्वस्त सचिन तांबे तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. शिवसनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील काही वेळासाठी या परिक्रमेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही त्याची पर्वा न करता लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली. प्रसारमाध्यमांनी याकडे लक्ष वेधले असता त्यांनी त्यानंतर मात्र तिथून काढता पाय घेतला.

देश - विदेशातील लाखो भाविकांची शिर्डीच्या साईबाबांवर निस्सिम श्रद्धा आहे. मात्र भाविकांनी आणि खास करुन ग्रामस्थांनी कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या आदेशाचं पालन न केल्याने आता प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालखी आयोजकांना सूचना
रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालखी आयोजकांना पालख्या न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी न आणण्याचं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. दरवर्षी 97 हुन अधिक पालख्या शिर्डीत येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालख्या मुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. गरज नसेल तर मंदिरात येणं टाळावं असं साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे.


संंबंधित बातम्या : 


#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण


Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं


#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे