पुणे : आतापर्यंत जगभरात 4 हजार जणांचे प्राण घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा भयाण चेहरा समोर आला आहे. कारण पुण्यात कोरोनाग्रस्त झालेल्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच कोरोनाग्रस्तांची ओळख उघड न करण्याचं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी केलं आहे. पुण्यातील कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णाचे नाव आणि ओळख काही माध्यमांनी आणि सोशल मीडियावर उघड केली होती. त्यामुळे या रुग्णाच्या गावातील लोकांनी कुटुंबाला वाळीत टाकलंय. या रुग्णाच्या कुटुंबाने वकिलांमार्फत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर ती तक्रार सायबर सेलकडे सोपवण्यात आली आहे.


आतापर्यंत भारतात कोरोनाचे 60 रूग्ण आढळले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यातही कोरोनाचे पाच रूग्ण आढळले आहेत. पुण्यातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रूग्णांपैकी एका रुग्णाच्या घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या सोलापूरमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. 'आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा' असं म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे.

Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा

त्या व्यक्तीच्या घरच्यांना सतत गाव सोडून जाण्यासाठी तगादा लावला जात आहे. गावकऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे कोरोना बाधित रुग्णाच्या भावाने सांगितले आहे. कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक माझा भाऊ आहे. माझ्या भावाला आजार झाल्याचे समजताच घरी जाऊन सर्वांना धीर दिला. गावकरी आमच्या घरी आले, विचारपूस करू लागले. तर काहींनी तुम्ही गावामध्ये राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला हा आजार होईल, असं पीडित व्यक्तिच्या भावाने सांगितलं.

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

एका बाजूला भाऊ आजारी, तर दुसर्‍या बाजूला गावकऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रास, यांमुळे अडचणी वाढल्या आहेत. कठीण परिस्थितीमध्ये गावानं-गावकऱ्यांनी पाठीशी उभे राहणं गरजेचं होतं. मात्र गावकऱ्यांनी आमच्या घरावरच बहिष्कार टाकला. त्यामुळे घरातील सगळेच चिंतेत आहेत. आता यावर सरकारनंच निर्णय घ्यावा. आम्हाला या संकटातून बाहेर काढावं, अशी मागणी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या भावानं केली आहे.

Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल