Corona Virus : काळजी घ्या! राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव, 24 तासात आढळले 98 रुग्ण, मुंबई-पुण्यात किती?

Corona Virus : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात 98 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Continues below advertisement

Corona Virus : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यभरात 98 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यामध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येकी 34 रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 10 रुग्ण तर पुणे ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 5 जून 2025 या कालावधीत राज्यात एकूण 14,565 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. यापैकी 1,162 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईत सर्वाधिक 575 रुग्ण आढळले असून, हे प्रमाण चिंतेची बाब आहे.

Continues below advertisement

सध्या राज्यात 548 सक्रिय करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय, आतापर्यंत 597 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 16 जण हे सहव्याधीग्रस्त होते. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार आणि क्षयरोग अशा गंभीर आजारांचे प्रमाण अधिक होते. तर श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांचे राज्यभरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे आणि त्यांची करोना चाचणी केली जात आहे.

कोणत्या शहरात किती रुग्ण? 

गेल्या 24 तासांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये मुंबई आणि पुणे (प्रत्येकी 34), पिंपरी-चिंचवड (10), पुणे ग्रामीण आणि ठाणे (प्रत्येकी 4), सांगली व छत्रपती संभाजीनगर (प्रत्येकी 3), कल्याण (2), तसेच वसई-विरार, सातारा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली आहे. 

देशात चार नवीन व्हेरिएंट्सची नोंद

दरम्यान, भारतामध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असताना, देशात चार नवीन व्हेरिएंट्सची नोंद झाली आहे. याबाबत आयसीएमआरचे संचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम भारतातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 हे प्रकार आढळले आहेत. इतर भागांतील नमुनेही गोळा करण्यात येत असून, नव्या प्रकारांची ओळख पटवण्यासाठी त्यांची क्रमवारी लावली जात आहे. डॉ. बहल यांनी स्पष्ट केले की, या नव्या प्रकारांमुळे रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत, त्यामुळे घाबरण्याची गरज नसून नागरिकांनी केवळ आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.

तर जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकारांना "चिंताजनक" म्हणून वर्गीकृत न करता, "देखरेखीखाली असलेले प्रकार" या श्रेणीत ठेवले आहे. चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना हे प्रकार दिसून येत आहेत. विशेषतः NB.1.8.1 या प्रकारामध्ये A435S, V445H आणि T478I यांसारखी स्पाइक प्रोटीन म्युटेशन्स असल्यामुळे तो तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे आणि आधीच्या संक्रमणातून तयार झालेल्या प्रतिकारशक्तीवर त्याचा परिणाम कमी होत आहे. सध्या भारतात JN.1 हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळत असून, चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी अर्ध्याहून अधिक नमुन्यांमध्ये तो आढळून आला आहे. त्यानंतर BA.2 (26 टक्के) आणि ओमिक्रॉनच्या इतर उपप्रकारांतील (20 टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे.

आणखी वाचा 

Bengaluru Stampede Case : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, आरसीबीच्या ताफ्यातील बड्या व्यक्तीला अटक, विराटच्या संघाला जबर झटका

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola