Russia Ukraine War : मागील चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत, तसेच सत्तांतर देखील झालेले नाही. या चार वर्षांच्या कालावधीत युक्रेनने अनेक चढउतार अनुभवले आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. ही विस्कटलेली अर्थव्यवस्था पुन्हा स्थिर करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या उपपंतप्रधान युलिया स्वीरिडेन्को यांना पंतप्रधानपदासाठी आमंत्रण दिले आहे. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, "आम्ही युक्रेनमधील कार्यकारिणीत बदल घडवत आहोत. मी युलिया स्वीरिडेन्को यांना युक्रेन सरकारचे नेतृत्व करण्यासाठी आणि प्रशासनाचे कार्य अधिक परिणामकारक करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आगामी काळात नवीन सरकारची धोरणे सादर करण्यास मी उत्सुक आहे," असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, युलिया स्वीरिडेन्को या विद्यमान पंतप्रधान डेनिस श्मिहल यांची जागा घेणार आहेत. डेनिस श्मिहल 2020 पासून पंतप्रधानपदावर कार्यरत होते. परंतु, आता त्यांच्या जागी युलिया यांची नियुक्ती होणार आहे. झेलेन्स्की यांचा उद्देश असा आहे की, युलिया यांना पंतप्रधान बनवून देशाची अर्थव्यवस्था स्थिर केली जावी आणि डेनिस यांना संरक्षणमंत्रीपद देऊन युद्धाच्या आघाडीवर युक्रेनची भूमिका अधिक मजबूत केली जावी.

सध्या युद्ध सुरू असल्यामुळे युक्रेन सरकारमध्ये कार्यकारी बदल करणे शक्य झालेले नाही. तसेच राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर  झेलेन्स्की यांना विद्यमान पंतप्रधान डेनिस श्मिहल यांना बदलण्यासाठी योग्य पर्यायी उमेदवार सापडत नव्हता. युलिया स्वीरिडेन्को उपपंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांची प्रतिमा देखील स्वच्छ व विश्वासार्ह मानली जाते. यामुळेच त्यांना पदोन्नती देत पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रशियाकडून युक्रेनवर सातत्याने होत असलेले हल्ले. या पार्श्वभूमीवर युक्रेनला अमेरिकेच्या मजबूत पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अमेरिकेशी सहकार्य आणि मदतीसंबंधी बोलणी करण्याची जबाबदारी आता युलिया यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहेत युलिया स्वीरिडेन्को?

युलिया स्वीरिडेन्को या 39 वर्षांच्या असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2008 मध्ये त्यांनी कीव विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्या युक्रेनमधील आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञांपैकी एक मानल्या जातात. खनिज करारांसंदर्भात अमेरिकेसोबत चर्चा करण्याची महत्त्वाची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युलिया यांच्यावर सोपवली होती. 2021 पासून त्या युक्रेनच्या उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोन्ही भूमिका निभावताना, त्यांनी वॉशिंग्टनमध्ये युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. 30 एप्रिल रोजी त्यांनी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांच्यासोबत एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अंतर्गत, युक्रेन आणि अमेरिकेने एक संयुक्त पुनर्बांधणी गुंतवणूक निधी स्थापन केला आहे. हा निधी महत्त्वाच्या खनिज साधनसंपत्ती तसेच तेल व वायूपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करणार आहे. 

आणखी वाचा

Army Chief Field Marshal Asim Munir: पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत? लष्करप्रमुखांबद्दल 'हे' धक्कादायक दावे; थेट पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण!