Nagpur News नागपूर : नक्षलवादाचा (Naxal) बिमोड करण्यासाठी आणि शहरी नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात नवा कायदा बनवला जातोय. "महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा" असं त्याचं नाव आहे. संविधानाला न मानणाऱ्या आणि शासनाविरोधात लढा पुकारणाऱ्या संघटनांवर नुसती बंदीच नाही, तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकारही सरकारला मिळणार आहे. संघटनांची बँक खाती गोठवणं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तीन ते सात वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचे अधिकारही पोलिसांना या कायद्याद्वारे मिळणार आहेत. मात्र या नव्या कायद्याविरोधात विरोधी पक्षाने या आधीच आक्षेप घेत या कायद्याला विरोध केला आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा करत सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.
नव्या कायद्यामुळे लोकशाहीला मोठा धोका- विजय वडेट्टीवार
"महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा" झाल्यास त्याला मोठा विरोध होण्याची ही शक्यता आहे. अनेकांना महाराष्ट्रात आता हा कायदा आणण्याची गरजच काय असा प्रश्न पडला आहे. तर प्रस्तावित कायद्यातील कठोर तरतुदींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवाद विरोधात आणण्याचा सरकारचा हेतू असला तरी हा कायदा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. या कायद्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू- विजय वडेट्टीवार
राज्यात कोणी सरकार विरोधात आंदोलन केले, एखादे स्टेटमेंट दिले, तरी कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी हे बिल आणल्या गेलं. त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला म्हणून ते मंजूर होऊ शकले नाही. आता अध्यादेश आणण्याची चर्चा आहे. मात्र आमचा त्याला विरोध कायम राहील आणि गरज पडली तर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू. असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
वाद थांबवण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अपयशी ठरले का?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची घरी जाऊन भेट घेतली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती स्वत: मंत्री छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दिली. याविषयी भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी वाद मिटवावा, असे छगन भुजबळ यांना वाटत आहे, मग मग हा वाद थांबवण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अपयशी ठरले का? भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनात जी वक्तव्य केली त्यातून वाद मिटवण्याचा काम केले की वाद वाढवण्याचे काम केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. पवार साहेब यांच्या इशाऱ्यानंतर विरोधक सर्वपक्षीय बैठकीला गेले नाही हे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हणत त्यांनी छगन भुजबळांनी केलेले आरोपही फेटाळून लावले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या