मुंबई :  राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं प्रकरण गाजत असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅपिंग केल्याची माहिती समोर आली आहे.  फक्त नाना पटोले यांचा फोन टॅपिंग केला नाही तर त्यांच्या जवळच्या आणखी तीन निकटवर्तीयांचे फोन टॅपिंग केल्याचं समोर आलं आहे. राज्यातील इतर नेत्यांचे फोन टॅपिंग होत असताना परवानगी न घेता फोन टॅपिंग केले होते मात्र नाना पटोले यांचा फोन टॅपिंग करत असताना ती परवानगी घेऊन केलेला आहे. मात्र ही परवानगी इतर नावाने घेऊन फोन टॅपिंग करण्यात आलेले आहेत. अमली पदार्थांची तस्करी करत असल्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली. त्यात नाव वेगळी मात्र मोबाईल नंबर नाना पटोले आणि त्यांच्या निकटवर्ती यांचा असल्याचं समोर आलं आहे.


यावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणाची योग्य चौकशी केली जावी, तसेच संबंधितांवर कठोर करवाई करावी. इतरही बऱ्याच मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येऊन चालणार नाही. जो याला जबाबदार आहे त्यावर कारवाई करावी, असं पटोलेंनी म्हटलं आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?
नाना पटोले यांचा अमजद खान नावाने फोन टॅप केला. 13 नोव्हेंबर 2017 आणि 18 सप्टेंबर 2017 यावेळी टॅप करण्यात आला. मदन मोहन लालजी चांडक मार्केट गोशाला रोड गोंदिया हा पत्ता वापरण्यात आला. इम्तियाज रफिक शेख नावाने उमेश डांगे यांचा फोन टॅप करण्यात आला. उमेश डांगे हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय आहेत. हा फोन 18 सप्टेंबर 2017 मध्ये टॅप करण्यात आला. सरफराज खान नावाने अभिषेक देशपांडे यांचा फोन टॅप करण्यात आला.  अभिषेक देशपांडे हे आर्किटेक्चर आहेत आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय आहेत. 2 नोव्हेंबर 2017 रोजी हा फोन टॅप करण्यात आला. विवेकानंद नगर, नागपूर हा पत्ता असल्याचं सांगण्यात आलं.