महात्मा, विश्वगुरु, जगतज्योती, कायक योगी, क्रांतियोगी या शिवाय विविध विशेषणांनी बसवेश्वर या नावाच्या विभूतीला ओळखले जाते. जन्माच्या वर्षाबद्दल काही मतमतांतरे असली तरी अक्षयतृतीयेला (वैशाख) त्यांचा जन्म झाला हे सर्वमान्य झाले आहे. ते जन्मले शैवब्राह्मण कुटुंबात. हे कुटुंब कर्मठ होते. मादरसा आणि मादलांबिका या दाम्पतीचे ते लाडके अपत्य. याच बागेवाडीचा नंतर बसवन बागेवाडी म्हणून लौकिक झाला. बसवण्णांच्या बालमनावर समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीभेद यांचा विपरित परिणाम झाला. या सर्व अनिष्ट बाबींचा त्यांना तिटकारा वाटत असे. इंगळेश्वर हे त्यांच्या मामाचे गाव. बसवण्णा काही काळ आपल्या मामाच्या गावात राहिले. कर्मकांडाचे अवास्तव स्तोम न माजवता शुद्ध आचार आणि निस्सीम भक्तीचा मार्ग बसवण्णांनी स्वीकारला. आपल्या मुंजीच्या वेळेसच त्यांनी आपल्या सनातनी वडिलांना याबद्दल विचारणा केली होती. यावरुन त्यांची वैचारिक आणि तत्त्वचिंतक मनाची साक्ष पटते. ही घटना बसवण्णांच्या महात्मा होण्याच्या वाटचालीतील पहिले स्थानक ठरले असे म्हणता येईल. अंत्यंत चिकित्सक बुद्धिमत्तेच्या या मुलाने बहिणीला वगळून मुलगा म्हणून होणार्‍या आपल्या उपनयन संस्काराला विरोध केला. धर्माच्या नावावर होणार्‍या कर्मकांडांना विरोध केला. श्रमप्रतिष्ठा सांगितली. बाराव्या शतकात त्यांनी उभारलेल्या समग्र कल्याणक्रांतीच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ मंगळवेढ्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही बसवण्णांची कर्मभूमी होती. कलचुरी राजघराण्यातील बिज्जळ राजांची मंगळवेढा ही राजधानी. बसवण्णानी मंगळवेढ्यात राज्य सेवा सुरु केली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मंगळवेढ्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर राजा बिज्जळांनी आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याणला आणली. येथे बसवण्णांकडे प्रधानमंत्रीपद देण्यात आले. समता, बंधुता आणि शांतता या मूल्यांवर आधारित जगातील पहिली लोकसंसद म्हणून गौरव मिळविणार्‍या अनुभव मंटपाची बसवण्णांनी स्थापना केली. 18 पगड जातींसह स्त्रियांनाही समान हक्क देणारे हे व्यासपीठ होते. बसवण्णा  केवळ सुधारणावादी विचार सांगून थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीवरही भर दिला. स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणले. येशूंपासून भगवान बुद्धांपर्यंतच्या सर्व करुणामयी समाजसुधारकांच्या वाट्याला आलेला द्वेष आणि कर्मठ लोकांचा विरोध बसवण्णांचाही वाट्याला आला.


केवळ जात व जन्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था बसवण्णांनी नाकारली. जन्माच्या नव्हे श्रमाच्या-कामाच्या वर्गवारीतून त्या व्यक्तिची ओळख असावी, असा आग्रह बसवण्णांनी 12 व्या शतकात धरला होता. 'लोखंड तापवून लोहार झाला, कपडे धूवून परीट झाला' अशी श्रमाधिष्ठित व्यवस्था ते मांडतात. भविष्य, ग्रहण आणि शुभाशुभ समजल्या जाणार्‍या संकल्पनांवर बसवण्णांनी कडाडून हल्ला केला आहे. तिथी, अमावस्या, अष्टमी, नवमी, संक्रांती, एकादशी अशा संकल्पनांवर बसवण्णा प्रहार करतात.


महात्मा बसवण्णा पुरोगामी होते. त्यांनी वेद, शास्त्र, पुराण, आगम, सूक्त आणि यज्ञातील कर्मकांडे आदींचा समाचार घेतला आहे. थेट वेदांच्या पाठीवर आसूड ओढण्याची, नाक कापण्याची त्यांची तयारी आहे. विवाह संस्थेवर बसवण्णांची श्रद्धा आहे. त्यांनी पती पत्नीनं परस्पर विश्वास आणि एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे. बसवण्णांनी कठोर पत्नी निष्ठा सांगितली आहे. ईश्वर आणि पती त्याचप्रमाणे ईश्वर आणि पत्नी अशी सरळ निष्ठा सांगितली. म्हणूनच पती-पत्नी समान पातळीवर आणताना दोघांच्याही कर्तव्यावर तेवढ्याच तीव्रतेने ते सांगतात.' श्रमाने थकलेला, भूकेने व्याकूळ झालेला पती घरी आल्यानंतर त्याला जेवण न वाढता, पती दुबळा झाला म्हणून दु:ख करणार्‍या पत्नी प्रमाणे त्याच्या येण्याची शुद्ध नाही, ना खाण्याची काळजी व दु:खाशिवाय अश्रु ढाळण्याचे ढोंग आहे. असे सांगतांना परधन आणि परस्त्री पासून दूर राहण्याचा, त्यांना नाकारण्याचा निश्चिय प्रत्येकाच्या मनाने करावा असा आग्रह बसवण्णा धरतात.


बसवण्णांचा एकूणच जीवन तत्वज्ञान अंतरंग शुध्दी आणि बहिरंग शुध्दी अशा दोन्ही पातळीवर आहे. आयुष्य जगण्याची रीत बसवण्णांनी स्पष्ट केली आहे. बसवण्णांनी माणूस आणि माणूसकीला केंद्रबिंदू मानले. त्यांनी आपले आयुष्य श्रमाला प्रतिष्ठा असणार्‍या, जातीभेदरहित, कर्मकांड आणि अंधश्रध्दा नसलेल्या समताधिष्ठित समाजनिर्मितीचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आयुष्य वेचले. आपल्या या चळवळीला व्यापक लोकचळवळ बनवून घराघरांत वचनामृत पोहोचवले. आजही समस्त मानवजातीला त्यांच्या विचारांची प्रकर्षाने गरज वाटते हीच या लोकोत्तर पुरुषाची महती आहे.