अमरावती : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद होताना दिसत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेत्या, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री यशोमती ठाकूर यांनी सामनामधील अग्रलेखाला जोरदार उत्तर देताना म्हटलं की, आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढे बघू असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.


भाजपने लावलेल्या ईडीच्या भीतीपोटी तर आम्हाला टार्गेट केलं जात तर नाही? असा टोला त्यांनी लगावला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कॉमन मिनिमम पोग्रामवर आम्ही चालत आहोत. मागील पाच वर्षांपूर्वी भाजप-शिवसेनेची युती होती. तेव्हा औरंगाबादचा विषय का निपटवला नाही, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.


महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद पेटला आहे. शिवसेनेसाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे. संभाजीनगर हे नाव शिवसेनेनच औरंगाबादला दिले असून, या नामांतरासाठी शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला हे नामांतरण करणे अवघड जात आहे.


रोखठोक सदरात संजय राऊत काय म्हणाले? 


संजय राऊत रोखठोक सदरात म्हणाले की, "हिंदुस्थानची घटना 'सेक्युलर' आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री 'औरंगाबाद' नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच."


पुढे संजय राऊत म्हणाले की, "औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने 'औरंगाबाद' शहर वसविले. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱहेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता,"


संबंधित बातम्या