Rajesh Tope Exclusive : राज्यातील आरोग्य विभागासंबंधी एक मोठी बातमी हाती आली आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचंही ते म्हणाले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची जाहिरात उद्या येईल, असं ते म्हणाले.


टोपे म्हणाले की, मी आरोग्य सचिवांना सोमवारपर्यंत जाहिरात देण्याबाबत सांगितलं आहे. जीएनएम, नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील. क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती असेल. 15 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल, असं ते म्हणाले.


जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे.


टोपे म्हणाले की, आधी एसईबीसी ग्रहित धरुन आपण अर्ज मागवले होते. आता एसईबीसी रद्द झाल्यानं ते ओपनमध्ये गेले. मग पुन्हा त्याचं रोस्टर बनवण्याची आवश्यकता होती. पूर्ण मागासवर्गीय कक्षांमध्ये याबाबत पूर्ण होमवर्क करावा लागला. प्रत्येक संवर्गाचा आम्ही रोस्टर फिक्स केले आणि आता परीक्षा आता आम्ही व्यवस्थित घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.


महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही
या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला, असं ते म्हणाले. ते म्हणाले. की, महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये, असंही टोपे म्हणाले.


केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही
राजेश टोपे म्हणाले की, कोरोना काळात केंद्राने राज्याला पूर्ण सहकार्य केलं आहे. केंद्राच्या कोविड मॅनेजमेंट आणि लसीकरणाच्या मॅनेजमेंटमधले काम चांगले आहे. केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही, असं ते म्हणाले. आजच्या गतीने महाराष्ट्रात तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होवू शकते, असं त्यांनी सांगितलं. गरज पडली तर महाराष्ट्रात लसीकरणासाठी राज्य सरकार निधी देवू शकते, असं देखील टोपे म्हणाले. महाराष्ट्रात देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत चार पट मृत्यू आहेत असं विचारलं असता ते म्हणाले की, इतर राज्यांनी मृत्यू लपवले असू शकतात.


टोपे म्हणाले की, आज देण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरमच्या कोव्हिशील्ड या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. लसीबाबत शासन आणि वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. यात सहभाग घेऊन सकरात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित राहावे असं आवाहन त्यांनी केलं.


जर कोविड काळात राज्य पातळीवर भ्रष्टाचार झाला असेल तर तो प्रकार मढ्याचे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे असं देखील ते म्हणाले. जिल्हा पातळीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या खरेदीत काही झाले असेल तर त्याला जिल्हाधिकारी जबाबदार असतील असंही ते म्हणाले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.