मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. मात्र यानंतर पुन्हा एकदा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला गेला. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाविषयी त्यांनी विचारलं असता ते म्हणाले की, 'त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार' यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू - बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, संभाजी महाराज आमचंही आराध्य दैवत आहे. नामांतराच्या कारणामुळं राजकारण होऊ नये. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू. काँग्रेसनं कायमच नामांतराला विरोध केला आहे. सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमानं काम करु. आम्ही आमची भूमिका एकत्र बसून मांडू आणि समजावून देऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट
सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवरुन संभाजीनगर असा नामोल्लेख
परवा, 6 तारखेला थेट सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. मात्र यानंतर काल पुन्हा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला आहे.काल CMO च्या ट्विटरवरुन म्हटलं आहे की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात
नाव बदलणं किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही - बाळासाहेब थोरात
काँग्रेसने अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटला विरोध केला होता. तरीही आज पुन्हा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या विषयी बोलताना म्हणाले होते की, "उत्तम काम कसं होऊ शकतं याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे. पण असं असलं तरीदेखील कोणत्याही एका शहराचं, गावाचं नाव बदलून वातावरण प्रदूषिक करण्याचं काही कारण नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही, त्यामुळे अशा प्रकारांना आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आदर्श आहेत. सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. परंतु, याप्रकरणात सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. खरंतर जिथे सरकारी डिपार्टमेंट काम करतं तिथे अशाप्रकारची चूक होता कामा नये, म्हणून मी त्यासंदर्भातील ट्वीट केलेलं आहे."
औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु
संबंधित बातम्या