मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. विरोधानंतरही शिवसेनेकडून नामांतराबाबत वक्तव्य केली गेली. यावर आता काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा नामांतराबाबत भूमिका स्पष्ट केलीय. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असं बाळासाहेब थोरांत यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं सदर रोखठोकमधून काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. 'औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला टोले लगावले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे.
भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढली
ट्वीटमध्ये थोरात म्हणतात, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
'औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे'; औंरगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेचा आक्रमक सूर
दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे
थोरात यांनी म्हटलं आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे, थोरात यांनी म्हटलं आहे.
आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करु नका
राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, थोरात यांनी म्हटलं आहे की. ते म्हणाले की, राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असं ते म्हणाले.
CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट
आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर
थोरात यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, थोरात यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
- 'औरंगाबाद की संभाजीनगर' काय आहे इतिहास, जाणून घ्या
- आमचं उष्ट कोणी खाऊ नये.. औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला
- शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात