औरंगाबाद : औरंगाबाद. पुरातन आणि ऐतिहासिक शहर आणि इतिहासाचं वरदान असलेलं हे शहर. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिबी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहराला सुशोभित करतात. निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याचा वल्गना राजकीय व्यासपीठावरून सुरु होतात. याच शहराचा नावाचा इतिहास एबीपी माझानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता. त्यात औरंगाबादचं नाव राजतडक असल्याचं आढळून आलं आहे. हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.

त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता. खऱ्या अर्थानं नहर ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतरानं 1633मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले. कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.
MNS in Aurangabad | मनसेच्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, शिवसेनेचा मुद्दा मनसेकडून हायजॅक  

काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि ऐलोरासारख्या वास्तूंमुळं अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याचं इतिहास तज्ञ सांगतात. अगदी प्राचीन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.

आतापर्यंत शहराच्या नावामागं शहराशी निगडीत सखोल अभ्यास असायचा संभाजीनगर नावामागंही काही इतिहास आहे का? हे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र याच उपयोग राजकारणासाठी होतो मग ती सेना असो वा भाजप किंवा आता मनसे. कदाचित संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. अथवा निवडणुका समोर आल्या म्हणून पुन्हा जुना मुद्दा नवीन करण्याचा प्रयत्न आहे हे शिवसेनेला माहीत. मात्र वरवर तरी औरंगजेबाचं नाव या शहराला नको अशीच भूमिका शिवसेना मांडतेय.

संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबानं केली आहे. त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असे शिवसेनेला वाटत असावं. काळ बदलला मात्र अजूनही सत्ता बदलली की आपल्या पद्धतीनं नाव बदलण्याचा प्रयत्न त्या त्या काळातील राजा करतो हेच यामागील सत्य म्हणावे लागेल. उद्या कदाचित शिवसेना भाजपची सत्ता बदल्यावर येणाऱ्या नव्या राजानं पुन्हा आपल्या सोयीनं या शहराचं नाव बदललं तर आश्चर्य वाटायला नको.