नागपूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून नितीन गडकरींच्याविरोधात शड्डू ठोकणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना यंदा काँग्रेस संधी देणार नसल्याची शक्यता आहे. प्राथमिक चाचपणीत सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांचा पत्त कट झाल्याचं समजतं. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. विलास मुत्तेमवार ऐवजी बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजपमधून काँग्रसमध्ये दाखल झालेल्यांच्या नावाची चर्चाही काँग्रेस कमिटी करताना दिसत नाही.


सूत्रांच्या माहितीनुसार ही नावे आहेत बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक. पण चौथं नाव म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे. आजपर्यंत ठाकरे म्हणजेच मुत्तेमवार असं होते. विकास ठाकरेंसाठी मुत्तेमवार अनेक लढे लढले आणि मुत्तेमवारांचा गट शहरात मजबूत होता, याचं सर्वात मोठे कारण होतं विकास ठाकरे यांची ग्राऊंड लेव्हलवरील ताकद. दोघांनीही आपल्या भूमिका आणि कामाचं नीट सीमांकन केलं होतं. पण प्राथमिक चाचपणीत मुत्तेमवारांचं नाव वगळून समोर येणारं चौथं नाव हे विकास ठाकरेंचं असेल, असं या दोघांनाही वाटलं नसेल.

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे 'नवा गडी, नवा राज्य' या नियमानुसार राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेत काही बदलही केले आहेत. स्थानिक स्तरावर निरीक्षकांकडून होणारी चाचपणी आणि त्यातून पुढे येणारी नावं प्रामुख्याने चर्चेला घेणं, हा त्या बदलाचाच एक भाग आहे.

राजा बदलला असला, तरी नागपूरचे गटातटाचे राजकारण जैसे थेच आहे. विजय वडेट्टीवार हे निरीक्षक आहेत. त्यामुळे ही नावं जरी निरीक्षकांनी मुंबईच्या बैठकीत पुढे ठेवली, तरी दिग्गजांचं म्हणणंही ऐकलं जाणार आहे. यात मुत्तेमवार यांच्यासारखंच नितीन राऊत, आशिष देशमुख, नाना पटोले यांनाही कार्यकर्त्यांची पसंती नसल्याचं चित्र आहे. मात्र या दिग्गजांचं आपलं एक स्थान असल्यामुळे, या प्राथमिक चाचपणीला फार महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया विलास मुत्तेमवार यांनी दिली आहे.

ही चार नावंच का आणि मुत्तेमवार का नाहीत? या उत्तर असं आहे की, निरीक्षकांनी कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा केल्यावर सर्वात जास्त समर्थन असणारी ही चार नावं निघाली. ही चार नावं जनसंपर्कात पुढे, तळागाळात काम करणारी आणि कार्यकर्त्यांचं मत मिळालेली आहेत. पण याबरोबरच अजून एक महत्वाचा सूर जो समोर आला तो म्हणजे गडकरींसमोर जातीय समीकरण बदलून उमेदवार द्यावा. उमेदवार बहुजन असावा. मग प्रफुल गुडढे असो की विकास ठाकरे, बबनराव तायवाडे असो की राजेंद्र मुळक चौघेही कुणबी समाजाचे आहेत, जो नागपूरचा एक मोठा मतदाता वर्ग आहे.

नागपुरात काँग्रेसजनच अनेक वेळा हे म्हणताना आढळतात की 'ये काँग्रेस है, शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते'. जिथे डबल बी फॉर्म वाटले जातात, जिथे पक्षाने अधिकृत म्हणून चक्क कोर्टात पाठवलेली नावंही विरोधी पक्षनेता म्हणून मान्य होत नाही. जिथे कार्यकर्ताच थेट प्रदेशाध्यक्षाच्या चेहऱ्यावर शाइफेक करतो, तिथे खरंच कितीही चाचपण्या घेतल्या तरी शेवटी काय होईल हे सांगता येत नाही.