बीड : टपोरीगिरी करणं बीडमधील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मुलीकडे एकटक पाहून डोळा मारणाऱ्या तरुणाला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पुरुषोत्तम ज्ञानदेव वीर असं 24 वर्षीय दोषीचं नाव असून तो शिरुर तालुक्यातील ढाकणवाडीचा रहिवासी आहे.

हे प्रकरण एप्रिल 2017 मधील आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगी शिरुरला जाण्यासाठी रायमोहा चौकात उभी होती. यावेळी पुरुषोत्तम वीर बराच वेळ तिला रोखून पाहत होता आणि त्यानंतर तिला डोळा मारला. मुलीने 20 एप्रिल 2017 रोजी पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

टपोरीगिरीला चाप, सलग 14 सेकंद तरुणींकडे रोखून पाहिल्यास जेल

मुलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल करुन एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.

त्यानंतर सत्र न्यायालयाने दीड वर्षानंतर दोषीला शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती प्राची कुलकर्णी यांनी दोषी पुरुषोत्तमला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 500 रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक महिना त्याला तुरुंगातच काढावा लागणार आहे.

14 सेंकद तरुणींकडे रोखून पाहणं अपराध असून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असं वक्तव्य केरळचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषीराज सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी केलं होतं. आता अशा प्रकरणात बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा होण्याची कदाचित ही पहिली घटना असावी.