सांगली : आई-वडिलांच्या औषधांचा खर्च परवडत नसल्याने सांगलीत शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषारी औषध पिऊन गणेश प्रकाश पाटील आणि लीलावती गणेश पाटील यांनी आयुष्य संपवलं.

सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील जाय गव्हाण गावात ही घटना घडली. गणेश पाटील यांची वडिलोपार्जित शेती आहे. आई-वडिलांच्या औषधासाठी त्यांनी उसने पैसे घेतले होते.

शेतात काही पिकत नसल्याने कर्ज फेडणं अशक्य झालं. म्हणूनच पाटील पती-पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पाटील यांच्या पश्चात पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी प्राथमिक माहिती घेत तातडीने याबाबत अहवाल सादर करण्याचे कवठेमहांकाळ तहसीलदार यांना आदेश दिले आहेत.