मुसळधार पावसाने चिपळूणमधील कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली, दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू
Chiplun News: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून चिपळूनमध्ये कॉलेजची संरक्षक भिंत ढासळल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Ratnagiri news: कोकणात सध्या पावसाने दाणादाण उडवली असून मुसळधार पावसाने चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत (Chiplun college wall collapsed) कोसळली. या दुर्घटनेत भिंतीखाली गाडला जाऊन महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
अतिपावसाने महाविद्यालयाची संरक्षक भिंत ढासळली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या परिसरात घटनेची माहिती कळल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
विद्यार्थी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्याने झाली शोधाशोध
हा विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू केली असता भिंतीच्या ढिगार्याखाली या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला. सुशांत घाणेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. खेडमधील रहिवासी असलेला सुशांत घाणेकर चिपळूणमध्ये डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
विद्यार्थ्यास रुग्णालयात हलवले
मुसळधार पावसाने चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाची भिंत ढासळली. यामध्ये 19 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा भिंत अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. ढिगार्याखाली सापडल्याने तरुणास रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे चिपळूण पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
या घटनेनंतर चिपळूणमध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन ही करण्यात आले असून कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
या यंत्रणेमध्ये ज्यांचा दोष असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोकणात पावसाने दाणादाण
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी (Ratnagiri Rain), रायगड, नवी मुंबई, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस पडतोय. दरम्यान कोकणातही तुफान पाऊस पडत असून चिपळूनमध्ये पावसाने दाणादाण उडाली आहे. गुहागर मध्ये पोमेंडी गावातील नदीला पूर आल्याने दोन वाड्यांशी संपर्क तुटला होता.मुसळधार पावसाचा फटका गावातील स्वयंभू सोमेश्वर मंदिराला बसला असून पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गेल्याची घटना घडली आहे.
सकाळपासून गुहागर मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. पावसाचा जोर वाढल्याने गुहागर ची मुख्य बाजारपेठ असलेली शृंगारतळी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते.
हेही वाचा: