स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवून महिला पोहचली पंचायत समितीत; जमिनीसाठी आईलाच कागदोपत्री मृत दाखवलं
Chhatrapati Sambhaji Nagar : ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: शेत जमिनीसाठी सावत्र मुलाने जिवंत असलेल्या आईला ग्रामपंचायतच्या कागदोपत्री मृत दाखविण्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघडकीस आला आहे. स्वतःचे मृत्यू प्रमाणपत्र घेवूनच ती महिला पंचायत समितीत दाखल झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे, या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तीन एकर शेतजमीन हडपण्याचा डाव मुलाने रचला असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने कोणतीही खातरजमा न करता हे प्रमाणपत्र कसे दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील आघूर येथील मंगलबाई उत्तमसिंग राजपूत या आपल्या मुलीच्या घरी रांजणगाव येथे राहतात. आघूर शिवारात त्यांची शेतजमीन आहे. ही शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने त्यांचा दीर शंकरसिंह रतनसिंह राजपूत, त्यांची दोन मुले आणि महिलेचा सावत्र मुलगा पंकज राजपूत यांनी ग्रामपंचायतला खोटी माहिती देत त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. पंकज राजपूत, दीपक राजपूत, शंकरसिंग राजपूत, सागर सोळुंके या सर्वांनी मिळून खोटी माहिती देऊन ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात देऊन आपली जमीन नावावर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
काय आहे प्रमाणपत्रामध्ये?
दरम्यान, आघूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने एका छापील नमुन्यात मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला दिला आहे. यात मृत व्यक्ती मंगलबाई उत्तमसिंग राजपूत असा उल्लेख आहे. जिवंत असलेल्या महिलेचा मृत्यू 15 मे 2023 रोजी झाल्याचे दाखवून नोंदणी केली गेली आहे. या नोंदणीचा क्रमांक 71/2023 दाखविण्यात आला आहे. प्रमाणपत्र 21 जून 2023 रोजी दिल्याची तारीख असून, त्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का आणि ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे.
वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश
या मृत्यू प्रमाणपत्रावर गंभीर स्वरूपातील चुका दिसून आल्याने त्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित होत आहे. महिलेचा मृत्यू 12 मे 2023 रोजी म्हंटले असतांना नोंदणी मात्र मागील वर्षी 17 मे 2022 रोजी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र ग्रामसेवकानेच दिले कि अन्य कोणी शिक्क्यांचा वापर करून हे तयार केला याचे कोडे निर्माण झाले आहे. दरम्यान जिवंत महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र कोणत्या आधारे देण्यात आले? याबाबत आपला वस्तुनिष्ठ अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश ग्रामसेवक के. जे. काळे यांना पंचायत समिती प्रशासनाने दिले.
इतर महत्वाच्या बातम्या :
चल आपण पळून जाऊ... लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; संभाजीनगरमधील घटना