(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकाची इमारत बनलीय दारूड्यांचा, प्रेमी युगुलांचा अड्डा!
मुंबई - गोवा हायवेला लागून असलेल्या या इमारतीला झाडाझुडपांनी देखील वेढा दिला होता. पण, काही शंभुप्रेमींनी आणि कॉलेजच्या तरूणांनी एकत्र येत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवजयंतीपूर्वी या इमारतीची साफसफाई केली.
रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नावानं उभारण्यात आलेली इमारत आता दारूडे आणि प्रेमी युगुलांचा अड्डा बनली आहे. संगमेश्वरातील हे धक्कादायक वास्तव असून त्याकडे आता स्मारक समिती आणि शासनाचं देखील दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या स्मारकाचा उपयोग आता भगतगिरी, दारूडे आणि प्नेमी युगुल करताना दिसत आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, कंडोम आणि भगतगिरीकरता वापरण्यात येणारी बाहुली देखील सापडली आहे. छत्रपती सभाजी महाराजांना दगाबाजीनं ज्या ठिकाणी पकडलं त्या कसबापासून काही अंतरावर आणि मुंबई - गोवा महामार्गाला लागूनच असलेल्या या स्मारकाला झाडाझुडपांचा वेढा होता. पण, काही शंभुप्रेमींनी एकत्र येत ही झाडं साफ केली. यावेळी त्यांनी दारूच्या बाटल्या, कंडोमची पाकिटं सापडल्याची माहिती 'एबीपी माझा'ला दिली आहे. 11 मार्च 1986 रोजी तत्कालीन मुंख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतिपसिंह राणे आणि महाराजांच्या काही वंशजांच्या उपस्थितीत जाखमाता मंदिराजवळ हा भूमिपुजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर जवळपास 15 ते 20 वर्षानंतर ही इमारत उभी राहिली. आतापर्यंत जवळपास 65 लाख रूपये खर्च या इमारतीवर करण्यात आला आहे. पण, सध्या मात्र या इमारतीची दुरावस्था झाली आहे. शिवाय, पावसाळ्यात देखील या इमारतीच्या छताला गळती लागलेली दिसून येते. त्यामुळे इतका निधी खर्च होऊन देखील छत्रपती संभाजी राजेंचं स्मारक निधी खर्च करण्याचं माध्यम ठरतंय का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
कोण आहे स्मारक समितीवर? काय म्हणणं आहे स्मारक समितीचं?
या साऱ्याबाबत स्मारक समितीच्या सदस्यांसोबत संवाद देखील साधण्यात आला. पण, या स्मारक समितीवर नेमकं कोण आहे? त्यांची ठोस अशी माहिती मात्र संबंधित सदस्याकडून देण्यात आलेली नाही. छत्रपती संभाजी राजे असं इमारतीला नाव नसून ते प्रस्तावित आहे. या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील देखील आहोत. पण, त्याला काही बंधनं येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणी काही कामं करण्यात आली. अशी माहिती यापैकी एका सदस्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे हा सारा काय प्रकार आहे? नेमकं काय सुरू आहे? सरकार अथवा शासन याबाबत गंभीर आहे का? आगामी काळात याबाबत काही ठोस अशी पावलं उचलली जाणार का? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
खर्चाचं ऑडिट देखील नाही?
या इमारतीवर करण्यात आलेल्या खर्चाचं ऑडिट देखील करण्यात आलेलं नाही, अशी माहिती या भागातील काही जेष्ठ पत्रकार देतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकरणात लक्ष घालावं. याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा इमारतीला छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती असं नाव तरी देऊ नये अशी मागणी देखील आता केली जात आहे.
केव्हा झालं भूमिपुजन? कोण होतं उपस्थित?
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वंशजांच्या उपस्थितीत 11 मार्च 1986 रोजी स्मारकाच्या भूमिपुजनाचा सोहळा संपन्न झालं. छत्रपती संंभाजी राजे यांचं तैलचित्र, राज्यातल्या विविध चित्रकारांच्या हस्ते साकारण्यात येणाऱ्या प्रतिमा, शंभुराजांच्या जीवनावरील काही पुस्तके आणि संभाजी महाराजांशी संबंधित संमगेश्वरातील काही वास्तु या ठिकाणी ठेवायचा असा विचार करून ही इमारत बांधण्यात आली. पण सध्याच्या घडीला मात्र या इमारतीची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. तुटलेली दारं आणि खिडक्यांची तावदाणं आणि काचा, गेटची दुरावस्था, सुरक्षा रक्षक इमारत, तुटलेल्या पायऱ्या आणि निखळलेले पेव्हर ब्लॉक असं सध्या सारं चित्र या एक एकरवर असलेल्या स्मारकाच्या ठिकाणी दिसून येत आहे.
कोण करतं इमारतीचा सफाई?
मुंबई - गोवा हायवेला लागून असलेल्या या इमारतीला झाडाझुडपांनी देखील वेढा दिला होता. पण, काही शंभुप्रेमींनी आणि कॉलेजच्या तरूणांनी एकत्र येत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शिवजयंतीपूर्वी या इमारतीची साफसफाई केली. आम्ही दरवर्षी अशा प्रकारची सफाई करतो. पण, सरकार किंवा स्मारक समिती याकडे लक्ष देणार का? असा सवाल देखील केला जात आहे. शिवाय, शरद पवार मुख्यमंत्री असताना या स्मारकाचं भूमिपुजन झालं त्यांचाच राष्ट्रवादी पक्ष सध्या महाविकास आघाडीमध्ये सत्तेत आहे. शिवाय, पवार साहेब हे मार्गदर्शक देखील आहेत. त्यामुळे किमान त्यांनी तरी आता लक्ष घालावं अशी मागणी देखील केली जात आहे.