चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्पाच्या (Tiger Project) पर्यटनाला रविवार (1 ऑक्टोबर) पासून सुरुवात करण्यात आलीये. पर्यटन पुन्हा सुरु झाले असले तरीही ताडोबाची बुकींग वेबसाईट सुरु व्हायला मात्र उशीर झाला. त्यामुळे दिवळी, ख्रिसमसच्या काळात येणाऱ्या पर्यटनावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवार सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची दारं उघडण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ताडोबा-अंधारी हा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तीन महिने बंद असतो. तर 1 ऑक्टोबरपासून पुन्हा हा प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात येतो. दरम्यान याच पार्श्वभूमीवर ताडोबा प्रकल्पाच्या मोहर्ली गेटवर एक छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाचे दरवाजे तीन महिन्यांनंतर उघडण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, गाईड, जिप्सी चालक, ताडोबाचे कर्मचारी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
व्याघ्र प्रकल्प हिरवाईने नटला
यंदाच्या वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ताडोबा प्रकल्पामध्ये घनदाट हिरवाई पसरली आहे. ताडोबामधील नदी आणि नाले ओसंडू वाहू लागले आहेत. त्यामुळे अशा आल्हाददायक वातावरणामध्ये पर्यटकांना मनमुराद पर्यटनांचा आनंद लुटता येणार आहे. वाघ, बिबट्या, रानगवे, चितळ आणि सांबर या सारख्या वन्यप्राण्यांचे दर्शन पुन्हा होईल.
ताडोबाची जुनी वेबसाईट पुन्हा बंद
यंदाच्या वर्षापासून ताडोबाची जुनी वेबसाईट कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ताडोबाची नवी वेबसाईट पर्यटकांच्या सेवेत आली आहे. याच कारणांमुळे ताडोबाची नवी वेबसाईट सुरु होण्यास बराच अवधी लागला. ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु होण्याआधी एक आठवड्यापूर्वी नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना बुकिंग करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात जितके जास्त पर्यटक येतील तितके जास्त रोजगार या भागामध्ये निर्माण होतो. तर वर्षभरात अनेक पर्यटक या व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. देशातूनच नव्हे तर परदेशातून व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात.
या व्याघ्र प्रकल्पामध्ये अनेक प्राण्यांचं दर्शन पर्यटकांना होतं. पण जरी आता या व्याघ्र प्रकल्पाची नवी वेबसाईट सुरु झाली असली तरीही याचा परिणाम स्थानिक लोकांच्या व्यवसायावर होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या वेबाईटचा नक्की काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Tadoba Tiger Reserve : ताडोबा येथे दाखल होणार सहा विशेष जिप्सी , ताडोबा कोर झोन सिझन 1ऑक्टोबरपासून