नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात सातत्याने फसवणुकीच्या घटना समोर येत असून जिल्ह्यात एकाच दिवस तीन पोलीस ठाण्यात (Nashik police) फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. एका प्रकरणात हातचलाखीने तब्बल 80 हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे समोर आले तर एका प्रकरणात कोर्टात खोटे दावे दाखल करण्यात येऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला. तर तिसऱ्या घटनेत थेट खोटी नोकरीची ऑर्डर देऊन तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक (fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पहिली घटना निफाड पोलीस ठाणे (Nifad Police) अंतर्गत घडली आहे. शहरातील पवन पृथ्वीराज बागमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार शहरातील पेठ गल्ली परिसरात जनरल स्टोअर्सचे दुकान असून या ठिकाणी दुपारच्या तक्रारदाराच्या आई काम करत होत्या. याचवेळी एक संशयित आला, त्याने आई सुशीला बागमार यांना सांगितले की, आम्हाला आमच्या गावात मंदिर बांधायचे आहे, काहीतरी देणगी द्या, असे सांगुन त्याने खिशातील रूमाल काढून त्यावर एक फूलाचा हार ठेवला. त्यावर त्याच्या खिशातील सहाशे रुपये ठेवले. त्यानंतर 'आता तूमचे दागीने काढून या रूमालावर ठेवा' असे सांगून नंतर ते दागीने हात चलाखीने काढून त्याच्या खिशात ठेवत पळ काढला. जवळपास 80 हजार रुपयांचे दागिने गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुसरी घटना निफाड पोलीस ठाण्यांतर्गतच घडली आहे. यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस असून जमिनीच्या प्रकरणात ही फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. तक्रारीनुसार संशयितांनी संगनमत करुन तक्रारदाराचे वडील हे नाशिक (Nashik) येथे दवाखान्यात उपचारकामी अॅडमिट होते. यावेळी संशयितांनी निफाड कोर्टात खोटी कागदपत्रे बनवून तक्रारदाराच्या शेतजमीनीवरील मालकी हक्क नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोब तक्रारदाराविरुध्द निफाड न्यायालयात खोटे दावे दाखल केले. यावरून दहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोर्टातील वकिलासह रजिस्ट्रारचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे.
तर तिसरी फसवणुकीची घटना सटाणा पोलीस ठाणे (Satana Police) अंतर्गत घडली. या प्रकरणात पोस्ट खात्यात नोकरीला लावून देतो म्हणून दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित तक्रारीनुसार तक्रारदारास पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे अमिश दाखविले. यासाठी बनावट पोस्ट ऑर्डर तयार करण्यात येऊन तक्रारदाराला देण्यात आली. यासाठी संशयितांना तब्बल 2 लाख रुपये उकळले. जेव्हा खोटी ऑर्डर असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले, तेव्हा हे प्रकरण समोर आले. दरम्यान सतत अशा घडत असताना तरीदेखील नागरिक अशा घटनांना बळी पडत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यावर पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना याबाबतचे मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे दिसून येते.
इतर महत्वाची बातमी :