कोल्हापूर : किमान संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यामध्ये आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जंगलातील वाघ आणि पिंजऱ्यातील वाघ यावरून शिवसेनेवर टीका केली होती. वाघावरून सुरू असलेल्या टीकेला संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता संजय राऊत यांनीच शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात असल्याचे कबूल केले असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना चंद्रकांत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं होतं.  त्यावेळी इतका जोर लावला तसा जोर मराठा आरक्षणाच्या बाबतीत का लावला जात नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या सवलती देणे शक्य आहे ते देखील सरकार देत नाही. महाराष्ट्राचं वाटोळ या सरकारने लावलं आहे.


संभाजीराजे छत्रपती हे जरी मान्य करत नसते तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत, ते भाजपचे नेते आहेत. त्यांनी सरकारच्या निर्णयाची वाट पाहतो असं म्हणण्यापेक्षा वाट लावली पाहिजे. चालढकल करणं हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजे यांनी चालढकलपणा करू नये. आमदार आणि खासदार यांना जाब विचारून प्रश्न सुटणार आहे का? असे देखील यावेळी चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले.


Chandrakant Patil : मैत्री जंगलातल्या वाघाशी होती, पिंजऱ्यातल्या नाही, चंद्रकांत पाटील यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील


मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.  यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी नव्हे तर जंगलातील वाघाशी मैत्री करतो.