(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि पन्हाळ गड सात महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला!
चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन तसंच कोल्हापुरातील पन्हाळ गड नियम आणि अटींसह आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिन्यांपासून ही पर्यटन स्थळं बंद होती.
कोल्हापूर/चंद्रपूर : पुनश्च हरीओम म्हणत सरकारने अनेक गोष्टींवरील बंदी हळूहळू उठवली. राज्यातील काही पर्यटनस्थळी आजपासून खुली झाली आहेत. यात चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन तसंच कोल्हापुरातील पन्हाळगड नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सर्वच पर्यटन स्थळं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता तब्बल सात महिन्यांनी पर्यटन स्थळं सुरु होत असल्याने व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन आजपासून खुला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन पर्यटकांसाठी आजपासून खुला करण्यात आला आहे. तब्बल सात महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुलं होणार असून 18 मार्चपासून ताडोबा कोरोनामुळे बंद आहे. मात्र कोविडचा अटकाव करण्यासाठी काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ज्यात एका जिप्सीमध्ये आता सहा ऐवजी चार पर्यटक बसवणे, गर्भवती महिला, दहा वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले आहे तर कोविडसदृश्य लक्षणं आढळल्यास एखाद्या पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे.
कोल्हापुरातील पन्हाळगडाचे दरवाजे खुले दुसरीकडे कोल्हापुरातील पन्हाळगडही आजपासून अधिकृतरित्या खुलं होणार आहे. सात महिन्यानंतर पन्हाळगडाचे दरवाजे आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. पन्हाळा नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पन्हाळगडावर पर्यटकांना परवानगी असेल. वेळेचे बंधन, सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, खाद्यपदार्थ पार्सल स्वरुपात देणे, सरकारने घालून दिलेल्या या नियम आणि अटींचं पालन करण्याचं आवाहन नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी केलं आहे. जवळपास सात महिने गडावर पर्यटकच नसल्याने 70 टक्के व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आजपासून पन्हाळा गड पर्यटकांसाठी खुला झाल्याने इथल्या अर्थकारणाला गती मिळेल, असं सांगत व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.