Rajesh Tope : सध्या देशात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच आता शेजारील चीन आणि युरोपमधील काही देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. कारण, गेल्या काही आठवड्यांपासून तिथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारताचीही चिंता वाढू लागली आहे. चीन आणि कोरियामध्ये वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळं केंद्राने राज्य सरकारच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याचं आवाहन केल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळं पुढच्याला ठेच मागचा सावध अशा पद्धतीनं आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल असेही राजेश टोपे म्हणाले.


चीन आणि कोरियामध्ये वाढत्या रुग्ण संख्येमुळं केंद्राने राज्य सचिवांना काळजी घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. केंद्राच्या हे आवाहन सबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जशास तसे पाठवून याबाबत काळजी घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरियामध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. या लाटेत बेड्स उपलब्ध होत नाहीत. ही गंभीर परस्थिती पाहता काळजी घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.


बिनधास्त पद्धतीन वागून चालणार नाही, आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागले. असे केंद्राचे पत्र राज्य शासनाला आले आहे. या केंद्राच्या आवाहनाचे पालन करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. जिल्हा जिल्ह्यातील प्रशासन याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे काम करेल असे टोपे यांनी यावेळी सांगितलं. पुढच्याला ठेच मागचा सावध अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. याबाबत राज्य सरकार योग्य ते काम करत असल्याचे टोपे यांनी सांगितले.


 कोरोनामुळं चीनची अवस्था पुन्हा एकदा वाईट झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये कोरोनाचे विक्रमी नवे रुग्ण आढळत आहेत. 20 फेब्रुवारीपासून चीनमध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तिथे दररोज एक हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. चीनमध्ये 2021 वर्षामध्ये केवळ 15,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 2022 च्या 3 महिन्यांत संक्रमितांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: