Coronavirus Update : भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या आटोक्यात आला असून रुग्णवाढीचा आलेखही खूप कमी आहे. परंतु शेजारील चीन आणि युरोपमधील काही देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनत आहे. गेल्या काही आठवड्यांत तेथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारताचीही चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव यांना पत्र लिहून काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


'या' सूचना देण्यात आल्या
राजेश भूषण यांनी आपल्या पत्राद्वारे सर्वांना सांगितले आहे की, सर्वत्र चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियम या पाच धोरणांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या पाच मुद्यांवर सर्व संबंधित अधिकारी आणि विभागांनी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धोका लक्षात घेता डॉक्टरांनाही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.




 


'या' देशांमध्ये वाईट परिस्थिती
कोरोनामुळे चीनची अवस्था पुन्हा एकदा वाईट झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये कोरोनाचे विक्रमी नवे रुग्ण आढळत आहेत. 14 मार्च रोजी, चीनमध्ये 3602 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली, जी फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वाधिक संख्या आहे. 20 फेब्रुवारीपासून चीनमध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तिथे दररोज एक हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. चीनमध्ये 2021 वर्षामध्ये केवळ 15,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 2022 च्या 3 महिन्यांत संक्रमितांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha