मुंबई : गेल्या काही दिवसांत भाजप आणि अजित पवार यांची जवळीक असल्याच्या राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मांडला जाणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आता याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे.


भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत नेमका काय प्रस्ताव मांडला जाणार?


सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याच्या ऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे.


अशा आशयाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब नंतर भाजप अजित पवार आणि अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :