पुणे : आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 


पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्यानं स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे. 


मालकी महापालिकेची आणि नोटिस बिल्डरची
आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात बुधवारी महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची  कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं आयुक्तांनी आश्वासन दिलं असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 


आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथं राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न  न करता महापालिका ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.


ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केलं जायला हवं असं पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.


महत्वाच्या बातम्या :