सातारा : दाट झाडी आणि चहूबाजूने जंगल. या जंगलात गेल्यावर आश्चर्य वाटतं त्याचं कारण म्हणजे हे जंगल फक्त वडाच्या झाडांच्या पारंब्यांनी भरलेलं आहे. एक वडाचं झाड, ते झाड मोठं झाल्यावर त्याची पारंबी, मग त्या पारंबीचं झाड. नंतर त्या झाडाला नव्याने पारंबी. नंतर त्या पारंबीचे झाड, नंतर पुन्हा त्या झाडाला पारंबी....एका वडाच्या झाडाचा प्रवास असा काही सुरु झाला की हे झाड एक दोन नव्हे तर तब्बल साडे पाच एकरात पसरलं. असं म्हटलं जातं की 1880 सालापूर्वी एक वडाचं झाड होत आणि कालांतराने या एका वडाच्या झाडाचा पसारा असा फुलत गेला. हे सर्व एकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटणार यात शंका नाही.


हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हसवे गावातलं. पाचवडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. टुमदार असलेल्या या गावाला तिन्ही बाजूने हिरवागार डोंगराने व्यापलंय आणि यातील एका डोंगराचा भाग म्हणजे वैराटगड. याच्याच पायथ्याला हे म्हसवे गाव वसलेलं.. गावाचं मूळ नाव तसं म्हसवे मात्र या व्यापक वडाच्या झाडामुळे या गावाला म्हसवे वडाचे म्हणून ओळखलं जातं.


ब्रिटीश काळातील इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांनी पुस्तकात नोंद करत असताना आशिया खंडातील सर्वाधिक मोठे झाड म्हणून त्याची नोंद केली. महाराष्ट्राचा हा एक अनमोल ठेवा आहे. मात्र या अनमोल ठेव्याची किंमत प्रशासकीय यंत्रणेला आजपर्यंत नाही. ग्रामस्थ झटत आहेत मात्र त्यांना यश मिळत नाही, असं इथले ग्रामस्थ आणि पेशाने शिक्षक असलेले विजय शिर्के सांगतात.


तर या वडाच्या जंगलात आल्यानंतर मन प्रसन्न होतं. मात्र या ठिकाणी असलेल्या अनावश्यक झुडपांमुळे आत जाता येत नाही. आत जाता येत नसल्यामुळे इथे आलेले पर्यटक नाराजीने परत जातात, असं ग्रामस्थ मारुती शिर्के यांनी सांगितलं.




1882 साली 'फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी' या पुस्तकात या झाडीची नोंद झाली. साडे पाच एकराच्या परिसरातील या वडाच्या झाडाचं मूळ झाड नष्ट झाल्याचं सांगितलं जातं. मात्र त्या नंतरही या झाडाचा विस्तार आजही थांबलेला नाही. आजही नवीन वडाची पारंबी तयार होऊन ती जमिनीत जात आहे. यातील अनेक झाडे ही गगनाला भिडली आहेत. त्याचे टोकही दिसत नाही. प्रत्येक वटपौर्णिमेला या ठिकाणच्या वडांच्या झाडांचे पूजन करण्यासाठी पंचक्रोशीतील महिला इथे येतात. असंख्य वड असल्यामुळे महिलांची आजिबात गर्दी होत नाही. आपल्या मनपसंतिच्या झाडाचं गटागटाने पूजन करतात. या गगनचुंबी वडाच्या झाडाचे आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन करणे आणि या वडांच्या पारंब्यांमधून वाट काढत फिरणे म्हणजे या गावातील सौभाग्यवतींचे भाग्यच.


ऐतिहासिक ठेवा असलेलं हे वडाचं झाड सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. या झाडाची शासनाने दखल घेऊन याला पर्यटनाचा 'क' दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत, पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत.


राज्याबाहेर अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत जिथे प्रशासकीय यंत्रणेच्या पुढाकाराने तयार केली आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना येण्यास भाग पाडलं जात. मात्र महाराष्ट्रातील ही अशीही काही स्थळं आहेत की त्याची नोंद इंग्रजांनी करुन ठेवली, मात्र आपल्या प्रशासकीय यंत्रणेला जागं करता करता या गावाची अख्खी पिढीच्या पिढी संपली. आता प्रश्न पडतो आणखी किती पिढ्या हे राज्यकर्ते, प्रशासन संपवणार?