मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आज 44 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचे घसरलेले शेअर्स मुकेश अंबानींच्या घोषणेनंतर वधारतील काय याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. आज होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचे शेअर्स  0.7 टक्क्यांनी म्हणजे 15 रुपयांनी घसरुन 2190 रुपयांवर आले आहेत. मुकेश अंबानींच्या घोषणेनंतर रिलायन्सचे शेअर्स वधारतील काय अशी उत्सुकता गुंतवणूकदारांना लागली आहे.


आजच्या बैठकीमध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेअर होल्डर्सना संबोधित करणार आहेत. त्याचे यूट्यूबवर स्ट्रिमिंग होणार असल्याने मुकेश अंबानी आज काय घोषणा करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


 देशातील 5G मोबाईलची स्पर्धा पाहता रिलायन्सकडून सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची आज घोषणा होऊ शकते. तसेच रिलायन्सकडून सर्वात स्वस्त लॅपटॉप, JioBook लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. हा लॅपटॉप  4G LTE कनेक्टिव्हिटी सोबत असेल आणि Android आधारित JioOS वर काम करेल असा दावा केला जातोय. गेल्या वर्षी गुगल कडून रिलायन्स उद्योग समूहाला 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली होती. 


गेल्या दहा वर्षात वार्षिक बैठकीनंतर सहा वेळा रिलायन्सचे शेअर्स घसरले आहेत तर चार वेळा शेअर्सची किंमत वाढली आहे. 2019 सालच्या बैठकीनंतर रिलायन्सचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले होते तर 2020 साली 3.71 टक्क्यांनी घसरले होते. 


गेल्या दहा वर्षात, बैठक झाल्यानंतर एक आठवडा ते महिन्याभराच्या काळात रिलायन्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एका वर्षाचा विचार करता रिलायन्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 27 टक्क्यांनी तर सेंसेक्समध्ये 51 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलंय. 2021 सालचा विचार करता रिलायन्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 13 टक्क्यांनी तर सेंसेक्समध्ये 10 टक्क्यांनी वाढले होते. 


गुंतवणूकदारांना या महत्वाच्या घोषणा मुकेश अंबानींकडून अपेक्षित आहेत.


5G फोन लॉन्च 
रिलायन्सने आपला पहिला  5G फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. याकडे अनेक गुंतवणूकदारांची नजर आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी तशी घोषणा केली होती. 


रिटेल आरआयएल साठी महत्वाची घोषणा 
रिलायन्सचे  JioMart सध्या देशातील दोनशेहून जास्त शहरात सुरु आहे. त्याच्याविषयी महत्वाची घोषणा आजच्या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच AJIO या रिलायन्सच्या फॅशन आणि लाईफस्टाईल प्लॅटफॉर्मविषयी काही महत्वपूर्ण घोषणा होणार आहे. 


रिलायन्स-सौदी अरामको दरम्यान 15 अब्ज रुपयांचा व्यवहार
रिलायन्सच्या ऑईल-टू-केमिकल (O2C) आणि सौदी अरबची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको (Saudi Aramco) यांच्या दरम्यान 15 अब्ज रुपयांच्या व्यवहाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यामध्ये रिलायन्सच्या ऑईल टू केमिकलच्या 20 टक्के भागिदारी विक्रीसंबंधी बोलणी सुरु आहे. पण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यामध्ये फारशी काही प्रगती झाली नव्हती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या व्यवहाराची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.  


डीकार्बनायझेशनचे 2035 पर्यंत लक्ष्य
रिलायन्स येत्या काळात पर्यावरणपूरक गुंतवणूक आकर्षित करणार असून त्यासाठी 2035 सालापर्यंत डीकार्बनायझेशनचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्याच्या रोडमॅपची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या :