सोलापूर : सोलापुरातल्या मोदी स्मशानभूमीत असलेल्या विद्युत दाहिनीच्या चिमणीचा परिसरातील नागरिकांना त्रास होतोय. चिमनीतून मोठ्या प्रमाणावर धूर निघतो. हा धूर आणि काजळी परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी पालिका आय़ुक्तांकडे केली आहे. 


सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत सध्या विद्युत दाहिन्या कार्यरत आहेत. एक विद्युत दाहिनी ही 1980 साली बसविण्यात आली होती. तर दुसरी विद्युत दाहिनी ही मागील काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. 1980 साली सुरु करण्यात आलेल्या विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची ही अंत्यत कमी आहे. त्यामुळे त्यातून बाहेर निघणारे धूर आणि काजळी उंच आकाशात न जाता परिसरातील नागरिकांच्या घरात जात आहे. अशी तक्रार राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी केली आहे.


यांसदर्भात एबीपी माझाने किसन जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी ते म्हणाले की, "मोदी स्मशानभूमीत सध्या दोन चिमणी कार्यरत आहेत. जून्या चिमणीतून निघणारा धूर हा परिसरातील नागरिकांच्या घरात जात असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे केली होती. त्यावेळी नवीन विद्यूत दाहिनी सुरु करण्याची मान्यता देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी नवीन विद्युत दाहिनी सुरु करण्यात आली आहे. नवीन चिमणीची उंची जास्त असल्याने त्याचा काही त्रास नाहीये. मात्र कोरोनामुळे विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही चिमण्या कार्यरत आहे. जुन्या चिमणीतून ऩिघणारी काजळी आणि धूर हे थेट नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे  लोक वैतागले आहेत, नागरिकांचा रोष वाढण्याआधी पालिकेने यावर तात्काळ उपाय योजना करावी." अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती नगरसेवक किसन जाधव यांनी केली. दरम्यान पालिका आय़ुक्त पी. शिवशंकर यांनी यासंदर्भात दखल घेतली असून संबंधितांना उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील किसन जाधव यांनी दिली. 


बंद अवस्थेत असलेल्या विद्युत दाहिनीसाठी प्रिसिजन ग्रुपने घेतला होता पुढाकार


कोरोनाच्या मागील लाटेत अतिरिक्त वापर झाल्याने जूनी विद्यूत दाहिनी ही बंद पडली होती. बंद अवस्थेत असलेल्या सोलापुरातील मोदी स्मशानभूमितील विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीसाठी प्रिसिजन कॅमशाफ्ट्सने पुढाकार घेतला. मोदी स्मशानभुमीतील बंद पडलेल्या जुन्या विद्युत दाहिनीची दुरावस्था एबीपी माझाने दाखवली होती. हीच अवस्था लक्षात घेत प्रसिद्ध उद्योग समुह प्रिसिजन कॅमशाफ्ट्सने विद्युत दाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसात ही विद्युत दाहिनी दुरुस्त केल्याने नव्या विद्यूत दाहिनीवर येणारा ताण देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला. सोलापुरात सध्या मोदी स्मशानभूमीत दोन विद्यूत दाहिन्या आहेत. तर अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत एक गॅस दाहिनी आहे.